
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (AP) नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीकडेच राहावीत, अशी मागणी या नेत्यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा यांसारखी महत्त्वाची खाती होती. ही सर्व खाती राष्ट्रवादीच्या कोट्यातच राहावीत, यासाठी पक्षाकडून लवकरच अधिकृत पत्र दिले जाणार आहे.
लोकभावनेचा आदर करणार – प्रफुल्ल पटेल
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘आम्ही महायुतीचे भागीदार आहोत, त्यामुळे अजित दादांची रिक्त झालेली पदे लवकरात लवकर भरण्याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मात्र, कोणताही निर्णय घेताना आम्ही ‘जनभावना’ लक्षात घेऊ. पवार कुटुंब सध्या दु:खात आहे, त्यांना यातून सावरण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. लवकरच सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबियांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू.’
रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक
राष्ट्रवादीने रविवारी आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पक्षाच्या नव्या अध्यक्षाबाबतही या बैठकीत निर्णय होऊ शकतो.
विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी खळबळजनक दावा केला की, दोन्ही गट एकत्र येणे ही अजित दादांची शेवटची इच्छा होती. ‘अजित दादांचा विलिनीकरणावर ठाम विश्वास होता आणि त्यासाठी त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. आगामी काळात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊन यावर निर्णय घेईल’, असे देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ खडसे यांनीही विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सूतोवाच केले.
NCP Leaders Meet CM Fadnavis to Claim Ajit Pawar’s Portfolios | Merger Speculations Rise
Senior NCP leaders met Maharashtra CM Devendra Fadnavis to claim portfolios held by late Ajit Pawar. Meanwhile, Anil Deshmukh claims a merger of NCP factions was Ajit Pawar’s last wish. Get the latest political updates.



























































