
जगभरातील टेक कंपन्यांमध्ये सध्या सुरू असलेली कर्मचारी कपात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) चा वाढता प्रभाव यामुळे रोजगाराच्या संकटाबाबत जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. आगामी पाच वर्षांत ‘एआय’मुळे सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर दुबई येथे आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026’ दरम्यान दुबईचे प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘डेमाक समूहा’चे संस्थापक अध्यक्ष हुसैन सजवानी यांनी जागतिक रोजगाराच्या भविष्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. एआय तंत्रज्ञान जॉब मार्केटमध्ये मोठी क्रांती घडवून आणणार असून, त्याचा सर्वाधिक फटका मनुष्यबळ पुरवणाऱ्या अर्थव्यवस्थांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हुसैन सजवानी यांच्या मते, इंटरनेटच्या आगमनानंतर जगामध्ये जे बदल झाले होते, त्यापेक्षा एआयचा प्रभाव अधिक पटीने व्यापक आणि सखोल असणार आहे. एआयमुळे जग केवळ 10 पटीने नव्हे, तर 100 पटीने बदलू शकते. जे देश या तांत्रिक बदलाचा वेळीच स्वीकार करणार नाहीत, त्यांच्यासाठी आगामी काळ मोठ्या धोक्याचा ठरू शकतो. विशेषतः जे देश बाहेरील देशांतून येणाऱ्या कामगारांवर आणि मनुष्यबळावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, त्यांना सर्वाधिक आव्हानांचा सामना करावा लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे, आजवर जे काम प्रत्यक्ष कामगार करत होते, ते काम आता एआय अधिक प्रभावीपणे आणि वेगाने पूर्ण करणार आहे.
या बदलत्या जागतिक परिस्थितीचा हिंदुस्थानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हिंदुस्थानची ओळख जगात ‘आउटसोर्सिंग हब’ म्हणून आहे आणि देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयटी सेक्टर, बीपीओ तसेच बँक ऑफिस सेवांवर आधारित आहे. या क्षेत्रांमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे. मात्र, एआय आधारित ऑटोमेशनच्या आगमनामुळे या संपूर्ण उद्योगाचे स्वरूप बदलून जाण्याची शक्यता आहे. आयटी आणि सेवा क्षेत्रावर अवलंबून असलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे कमी होऊ शकतात. ज्यामुळे हिंदुस्थानसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासमोर रोजगाराचे नवीन आव्हान उभे राहू शकते. एआयचे हे संकट भविष्यासाठी धोक्याची घंटा मानली जात असून त्यावर जागतिक स्तरावर आता चर्चा सुरू झाली आहे.


























































