
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे. यातच आता अजित पवार गटाची धुरा कोण सांभाळणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचदरम्यान, शनिवारी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित पवार गटाच्या विधिमंडळ सदस्यांची उद्या म्हणजेच शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे. पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले आहेत की, “दादाला गेले आणि ज्या पद्धतीने गेले, ते सगळं प्रत्यक्ष जाऊन तिथं मी पाहिलं आहे. खरं म्हणजे झोप उडाल्यासारखी झाली आहे. पण शेवटी म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन. यातच पक्ष असेल किंवा सरकार असेल, कोणाकडे तरी याची जबाबदारी देऊन ते चालवावं लागेल. उद्या विधिमंडळाचे आमचे जे सदस्य आहेत, त्यांची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपद, जे अजित पवार यांच्याकडे होतं, ते देण्यासंदर्भात निर्णय होईल. काही लोकांच्या सूचना आल्या आहेत की, सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी द्यावी. अशी अनेक लोकांची मागणी असून ही मागणी काही चुकीची नाही, असं मला वाटतं. मात्र याचा निर्णय पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत होईल.”
ते म्हणाले आहेत की, “उपमुख्यमंत्रीपद रिकामं आहे. ते सुनेत्रा पवार यांच्याद्वारे कसं भरता येईल, याकडे आमचं लक्ष आहे. उद्याची बैठक पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची असून यात विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्यावर एकमत झालं तर, उद्याच शपथविधी देखील होऊ शकतो.”


























































