
एकिकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’चा नारा शासन प्रशासनाकडून दिला जातो तर दुसरीकडे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे खेड तालुक्यात विविध ठिकाणी राजरोसपणे अवैधरित्या झाडांची कत्तल सुरू आहे. अशा या मानवी कृतीने पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे शिवाय जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. राजरोसपणे झाडांची कत्तल होत असतानाही वन विभाग मात्र बघ्याची भूमिकाच निभावताना दिसत आहे. त्यामुळे वन विभागाच्या आशिर्वादानेच वन संपत्तीचा नाश होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाडे नष्ट होत आहेत. यामुळे खेड तालुक्यातील वनसंपदा आर्थिक मांडवळीतूनच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा संदेश अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळेच येथे पायदळी तुडवला गेला आहे.



























































