Nanded News – मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा विस्तार, तरुणाचा यशस्वी प्रयोग; अवघ्या दहा गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, या उक्तीचा अनोखा योग नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथील युवा शेतकरी बालाजी उपवार यांनी दाखवून दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करुन त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून ते लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत असून संध्या त्यांची नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील थंड हवामान असलेल्या महाबळेश्वर येथे पारंपरिकरित्या स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र आता स्ट्रॉबेरीची शेती महाबळेश्वर पुरती मर्यादित न राहता मराठवाड्यात ही विस्तारू लागली आहे. नांदेड जिल्ह्यात ही स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग होतं आहे. जिल्ह्यात एका युवा शेतकर्‍याने अवघ्या दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची बाग फुलवली असून त्यातून त्याला लाखो रुपयाचे उत्पन्न देखील मिळत आहे. बालाजी उपवार असे या शेतकर्‍याच नाव आहे. मागील सहा वर्षांपासून ते सातत्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत असून दरवर्षी अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात ते चांगला नफा मिळवत आहेत. बालाजी उपवार यांचा हा प्रयोग कौतुकास्पद ठरत आहे. यावर्षीही त्यांनी मेहनत करुन स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि त्यातून मोठे उत्पन्न ते आता मिळवत आहेत.

मुदखेड तालुक्यातील बारड येथील बालाजी उपवार यांना आठ एकर शेती आहे. बीएससी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा विचार केला. स्ट्रॉबेरी उत्पादनाची माहिती घेऊन उपवार यांनी आपल्या आठ एकर शेती पैकी दहा गुंट्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली. शिवाय फळ बाग फुळवली. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी उपवार यांना सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च आला आला. खर्च वजा जाता तीन ते चार लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मागील सहा वर्षा पासून उपवार हे स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत.

मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानाच्या भागात योग्य तंत्रज्ञान, ठिंबक सिंचन, शेडनेट आणि नियोजनबद्ध पद्धती वापरल्यास स्ट्रॉबेरीसारखी नगदी पिकेही यशस्वी होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. इतर शेतकर्‍यांनीही पारंपरिक पिकांबरोबर नवीन प्रयोगशील शेतीकडे वळावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन बालाजी उपवार यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची सर्वत्र कौतुक होतं आहे.