
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर नवीन करार करण्यासाठी अल्टीमेटम देत धमकी दिली होती. यानंतर आता यावर इराणने आपली प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या सेनेच्या प्रमुख मेजर जनरल अमीर हतामी म्हणाले आहेत की, आम्ही १,००० नवीन स्ट्रॅटेजिक ड्रोन तयार केले असून ते जमीन, समुद्र आणि हवाई हल्ल्यांसाठी सक्षम आहेत.”
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले होते की, “इराणने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर तातडीने अणुकरार करावा, अन्यथा अमेरिकेचा पुढचा हल्ला आणखी विनाशकारी असेल. ट्रम्प यांनी जून २०२५ मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणच्या प्रमुख परमाणु सुविधांवर हल्ला केला होता, याची आठवणही आपल्या पोस्टमध्ये करून दिली होती. ते म्हणाले होते की, जर इराणने त्याचे पालन केले नाही तर पुढचा हल्ला अधिक गंभीर असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला होता. त्यांनी असेही म्हटले होते की, अमेरिकेचा एक मोठा नौदल ताफा इराणच्या दिशेने येत आहे.
यानंतर इराणने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे. हे १,००० ड्रोन चारही लष्करी शाखांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. इराणने गुप्ततेसाठी या ड्रोनची छायाचित्रे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, अमेरिकेने मध्य पूर्वेत लष्करी तैनाती वाढवली असून USS अब्राहम लिंकन आणि USS थिओडोर रूझवेल्ट सारख्या विमानवाहू जहाजांसह मिसाइल डिस्ट्रॉयर्स आणि इतर १० युद्धनौका क्षेत्रात पोहोचल्या आहेत. इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला तात्काळ आणि निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.


























































