
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये म्हणून बारामती पोलिसांना दुर्घटनास्थळाचा ताबा घेतला असून नागरिकांना तिथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
28 जानेवारी रोजी बारामतीच्या गोझीबावी येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाले. त्या अपघाताची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारपासून चौकशी सुरू केली. आता सीआयडीमार्फतही चौकशी केली जाणार आहे. त्या दिवशी विमान उतरवण्यासाठी रनवे सज्ज असल्याचे एटीसीने कळवूनही पायलटकडून काहीच प्रतिसाद आला नव्हता आणि काही क्षणातच रनवेच्या बाजूला मोठय़ा ज्वाळा दिसून आल्या, तसेच एकापाठोपाठ अनेक स्फोट झाले होते. सीआयडी तपासात फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग्स आणि प्राथमिक माहिती यांचा अभ्यास केला जाणार असून दुर्घटनेच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमके काय घडले याचा उलगडा करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते.
‘एएआयबी’कडून विमान कंपनीच्या ऑफिसची झाडाझडती
अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास अन्वेषण विभागाने (एएआयबी) हाती घेतला आहे. एएआयबीच्या अधिकाऱयांनी आज व्हीएसआरच्या कार्यालयात जाऊन कंपनीतील अनेक कागदपत्रे, फाईल्स सील केली आहेत. एएआयबीचे अधिकारी व्हीएसआरच्या कार्यालयात पोहोचले असता अनेक जण कार्यालयातून गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विमान कंपनीच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.































































