
>> श्रीकांत आंब्रे
’झपाटा’ या चित्रपट गीत-संगीतावर आधारित लोकप्रिय वाद्यवृंदाच्या यशात मोलाचा वाटा असलेले प्रा. कृष्णकुमार गावंड रसिकांना परिचित आहेत ते त्यांच्या या विषयावरील आस्वादक आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे. त्यांचे ‘सुवर्णयुगाचे साक्षीदार’ हे अलीकडेच प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपली छाप उमटवणाऱया नट, गीतकार, गायक, संगीतकार, संगीत संयोजक, गायक, वादक आणि या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मनोज्ञ आठवणी आहेत. त्या सांगताना ते साचेबद्ध लेखन न करता रसिकांना माहीत नसलेल्या अनेक अप्रसिद्ध गोष्टींचा खजिनाही रिता करीत जातात. केवळ अभिनेते-अभिनेत्रीच नव्हेत तर चित्रपट विश्वाशी निगडित असलेल्या अनेक व्यक्तींच्या आठवणींना ते आपल्या ओघवत्या शैलीत उजाळा देतात. हे सर्व ते अतिशय आपुलकीने आणि जिव्हाळय़ाने करतात. कारण हिंदी-मराठी चित्रपट संगीत हेच त्यांचं सर्वस्व आहे. म्हणूनच त्या त्या व्यक्तींची गुणवैशिष्टय़े ते नेमक्या शब्दांत सांगतात. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील कलावंत साक्षीदारांच्या स्मृती ते जागवतात.
या पुस्तकात एकूण 78 छोटेखानी लेख आहेत, पण त्या प्रत्येक लेखातील अनुभवाचा आवाका खूप मोठा आहे. केवळ लेखांच्या शीर्षकातूनच ती व्यक्तिरेखा आणि तिचे गुणविशेष ते डोळय़ांसमोर उभे करतात. राज कपूरला असलेली संगीताच्या प्रत्येक घटकाची जाण त्याच्या चित्रपटातील गाण्यांना कशी उठाव देते त्याचा प्रत्यय ते ‘घर आया मेरा परदेसी’ गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या प्रसंगी घडलेल्या एका प्रसंगातून देतात. तशीच कपूर घराण्याच्या नटांची वैशिष्टय़ेही नेमकी अधोरेखित करतात. चित्रपट संगीतातील दत्तांच्या साम्राज्याचे वर्णन करताना के. दत्ता ऊर्फ दत्ता कोरगावकर, दत्ता डावजेकर यांच्याबरोबरच दत्तू ठेक्याचे जनक संगीतकार दत्ताराम ऊर्फ दत्ताराम वाडकर यांचीही गुणवैशिष्टय़े सांगतात.
भालजी पेंढारकर, सुलोचनादीदी, विजू खोटे – शुभा खोटे, शोभना समर्थ, नूतन, नलिनी जयवंत, ललिता पवार, उषा किरण, बेबी नंदा, राजश्री, जयश्री गडकर, श्यामा, शशिकला, कुमकुम, हेलन, अरुणा इराणी, संगीत सम्राट कुंदनलाल सैगल, संगीतकार पंकज मलिक, वसंत प्रभू, वसंत देसाई, सुधीर फडके, हुस्नलाल-भगतराम, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन, अनिल मोहिले, वसंत पवार, विद्याधर गोखले, मधुसूदन कालेलकर, राजा परांजपे, भा. रा. तांबे, ग. दि. माडगुळकर, राजा बढे, शेळके, मंगेश पाडगावकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, कवी प्रदीप, भरत व्यास, हसरत जयपुरी, सुधा मल्होत्रा, फैयाज, सुलोचना चव्हाण, शांताराम नांदगावकर, अशोक पत्की यांसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर भरभरून लिहिताना किती सांगू आणि किती नको असं त्यांना होऊन जातं. संगीतकार शंकर यांना ते आपलं दैवत मानतात, त्यांच्याशी झालेल्या दोस्तीनंतर त्यांच्या आठवणींना अधिक बहर येतो.
प्रा. कृष्णकुमार गावंड यांची चित्रपट संगीत विश्वावरील पाच पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. अनेक वृत्तपत्रांतून चित्रपट संगीताविषयी लेखन करणारे प्रा. गावंड यांना चित्रपट संगीताची जबरदस्त ओढ लावणारी कारणंही तशीच आहेत. सुरांचं, स्वरांचं ज्ञान आणि त्यासाठी टवकारलेले ‘कान’ त्यांच्यापाशी आहेत. त्यामुळेच रेडिओ सिलोनवरील ‘बिनाका गीतमाले’तील तसंच विविध भारतीवरील हिंदी चित्रपट गीतं आवडीने ऐकण्याचा छंद त्यांच्यासाठी चित्रपट संगीताच्या आस्वादाचं दालन खुलं करून गेला. लहानपणापासून लागलेली संगीताची आवड हेच त्यांचं विश्व बनलं.
त्यांच्या लेखनामुळे या क्षेत्रातील अनेक मौल्यवान व्यक्तिमत्त्वांच्या गुणांची ओळख महाराष्ट्राला झाली. त्यातील अनेक अद्भुत संगीत आख्यायिका वाचताना रसिकांचं कुतूहल वाढत गेलं. कमी शब्दांत खूप काही सांगण्याची हातोटी लेखकाकडे आहे. या पुस्तकात वारंवार त्याचा प्रत्यय येतो. रसिका वाचकांच्या मनात हे पुस्तक नक्कीच घर करून राहील. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांची प्रस्तावना तसंच हेमदत्त सावंत यांचं मुखपृष्ठ आकर्षक आहे.
साक्षीदार सुवर्णयुगाचे
लेखक : प्रा. कृष्णकुमार गावंड
प्रकाशक : उद्वेली बुक्स, ठाणे
पृष्ठे : 210 मूल्य : 400 रुपये























































