
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे सरकारमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. हीच पोकळी भरून काढण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची नोंद इतिहासात झाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजूबाजूला असलेल्या ढेकण आणि गिधाडांपासून सावध राहण्याचा सल्ला जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनामध्ये पार पडला. राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह नेतेमंडळी उपस्थित होते. शपथविधी पार पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार पहिल्या महिल्या मुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही, मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांच्याच माणूस हवा होता. त्यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावं. आता गिधाडं घिरट्या घालायला लागले आहेत, त्यांच्यावर आता लक्ष ठेवावं लागणार आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खाते नाही, पण तीन खात्यांची जबाबदारी
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी पार्थ आणि जय पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “अजितदादांसोबत न दिसणारे गिधाडं आता दिसू लागले आहेत. सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावं. काही अडचणींमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रिपत स्वीकारलं असावं. पार्थ पवार आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिसेल तर त्यांचं त्यांनी पालन करावं.” तसेच सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं, हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात. त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.




























































