
जगभरात वाढलेली लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधक लसीकरण मोहीम सर्वांनाच माहिती आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी ‘हम दो हमारे दो’ अशी मोहीमही राबवलेली अनेकांनी पाहिली आहे. परंतु, थायलंडमध्ये सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. थायलंड सरकारने चक्क हत्तींच्या गर्भनिरोधक लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
थायलंडमध्ये जंगली हत्तींचे वेगाने वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून थायलंडमध्ये हत्तींची संख्या भरमसाट वाढत आहे. यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात हत्ती दिसत आहेत. कधी कधी हत्ती आणि मनुष्यामध्ये संघर्षही होत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी आणि हत्तींची संख्या नियंत्रणात राहावी यासाठी हत्तींचे गर्भनिरोधक लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकाऱयाने दिली आहे. इतिहासात पहिल्यांदा हत्तींना गर्भनिरोधक लसीकरण केले जाणार आहे. वन्यजीव संरक्षण कार्यालयाचे संचालक सुखी बूनसांग यांनी सांगितले की, पूर्व थायलंडमध्ये हत्तिणींच्या जन्मदराचे दरवर्षीचे प्रमाण हे जवळपास 8 टक्के इतके आहे. जे तीन टक्के राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
























































