
केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, उच्च मूल्य शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रात, 500 जलाशय आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास केला जाणार आहे. तसेच किनारपट्टी भागांमध्ये मत्स्यव्यवसायाची मूल्यसाखळी मजबूत करण्यात येणार असून, स्टार्टअप्स, महिला नेतृत्वाखालील गट आणि मत्स्यशेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPO) माध्यमातून बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण केली जाणार आहे.
पशुसंवर्धन क्षेत्रात, ग्रामीण आणि उपनगर भागांमध्ये दर्जेदार रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी उद्योजकतेला चालना दिली जाणार आहे. यासाठी (a) कर्ज-संलग्न अनुदान योजना, (b) पशुधन उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विस्तार, (c) पशुधन, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनावर आधारित एकात्मिक मूल्यसाखळ्यांची उभारणी, तसेच (d) पशुधन शेतकरी उत्पादक संघटनांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
उच्च मूल्य शेतीच्या माध्यमातून, शेती उत्पादनांमध्ये विविधता आणणे, उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. किनारपट्टी भागात नारळ, चंदन, कोको आणि काजू पिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. ईशान्य भागात अगर वृक्ष, तर डोंगराळ भागात बदाम, अक्रोड आणि पाइन नट्ससारख्या सुकामेव्याच्या पिकांना सहाय्य दिले जाणार आहे.
हिंदुस्थान हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन नारळ उत्पादनावर अवलंबून आहे. नारळ उत्पादनातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना राबवण्याचा प्रस्ताव असून, त्याअंतर्गत जुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या झाडांच्या जागी नवीन रोपे आणि सुधारित वाण लावले जाणार आहेत.
भारतीय काजू आणि कोको क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबवण्यात येणार असून, कच्च्या काजू आणि कोको उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणे, निर्यातक्षमतेत वाढ करणे आणि 2030 पर्यंत भारतीय काजू व कोकोला जागतिक स्तरावर प्रीमियम ब्रँड म्हणून उभे करणे, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी निगडित असलेल्या चंदन शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने चंदन लागवड आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देणार आहे, ज्यामुळे भारतीय चंदन परिसंस्थेचा गौरव पुन्हा प्रस्थापित केला जाईल.
जुनी, कमी उत्पादन देणारी फळबागा पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच बदाम, अक्रोड आणि पाइन नट्ससारख्या पिकांची दाट लागवड वाढवण्यासाठी स्वतंत्र योजना राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि युवकांना मूल्यवर्धन प्रक्रियेत सहभागी करून घेणे, हा उद्देश आहे.
दरम्यान, शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी ‘भारत-VISTAAR’ (Virtually Integrated System to Access Agricultural Resources) ही बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ही प्रणाली AgriStack पोर्टल आणि ICARच्या शेती पद्धतींच्या माहितीला AI प्रणालीशी जोडेल. यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला, उत्पादनक्षमता वाढ, योग्य निर्णय घेण्यास मदत आणि शेतीतील जोखीम कमी करण्यास हातभार लागणार आहे.






















































