
>> प्रा. डॉ. अमरवेली बा. पाटील
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या वेणूताई सहधर्मचारिणी होत्या. अर्थात त्यांची ओळख केवळ एवढीच मर्यादित नव्हती. त्याग, कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि मूल्याधिष्ठत जीवन जगणाऱया भारतीय स्त्री म्हणून त्या ओळखल्या जातात. वेणूताई यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज समारोप आहे…
सातारा जिह्यातील फलटण येथील मोरे घराण्यात 2 फेब्रुवारी 1926 रोजी जन्मलेल्या वेणूताईंवर लहानपणापासूनच देशभक्ती, साधेपणा आणि संस्कारांची घडण झाली. शांत, सोज्वळ, करारी आणि शालीन स्वभावाने त्यांचे बालपण समृद्ध झाले. लग्न करायचेच असेल तर देशभक्ताशीच हा त्यांचा ठाम निश्चय होता. त्यानुसार 2 जून 1942 रोजी कराड येथील ‘मराठा बार्ंडग’च्या आवारात यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला.
विवाहानंतर लगेच 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळात यशवंतराव चव्हाण भूमिगत झाले. त्या अत्यंत कठीण काळात वेणूताईंनी पोलिसांच्या दडपशाहीला धैर्याने तोंड दिले. विवाहानंतरची पहिली संक्रांत असतानाच घरावर छापे टाकले गेले, चौकशी झाली तरीही त्यांनी प्रसंगावधान आणि संयमाने परिस्थिती हाताळली. अल्पवयीन असूनही त्यांच्यातील समंजसपणा आणि मानसिक कणखरपणा विलक्षण होता. यशवंतराव चव्हाण राजकारणात सक्रिय असताना घरातील सर्व जबाबदाऱया वेणूताईंनी समर्थपणे सांभाळल्या. संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळात त्यांनी पतीला मोलाची साथ दिली. मुख्यमंत्री व उपपंतप्रधान यांच्या पत्नी असूनही त्यांनी कधीही सत्तेचा किंवा पदाचा वापर स्वतःसाठी केला नाही. सक्रिय राजकारणापासून दूर राहून त्यांनी पतीच्या सार्वजनिक जीवनाला नैतिक बळ दिले. त्यांच्या निःस्वार्थ साथीमुळेच यशवंतराव चव्हाण निर्धास्तपणे देशसेवेसाठी स्वतःला झोकून देऊ शकले. यशवंतराव चव्हाण राजकीय जबाबदाऱयांमुळे बहुतेक वेळा घरापासून दूर असत. त्या काळात संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, आप्तेष्ट आणि घरात येणाऱया असंख्य कार्यकर्त्यांची जबाबदारी वेणूताईंनी अत्यंत प्रेमाने, संयमाने व मायेने सांभाळली. मातृत्व, करुणा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असे.
त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. चंदेरी व खादीच्या साडय़ा, साधे मंगळसूत्र आणि शालीनता हीच त्यांची वैशिष्टय़े होती. वेणूताई चव्हाण या केवळ एका महान नेत्याच्या पत्नी नव्हत्या, तर त्या त्याग, धैर्य, संयम, सामाजिक बांधीलकी यांचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. पडद्यामागे राहून त्यांनी दिलेले सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्पृतिक योगदान आजच्या पिढीसाठी आदर्श आहे. अनेक थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो. मात्र समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱया वेणूताईंसारख्या स्त्राr व्यक्तिमत्त्वाचे स्मरण होणे तितकेच आवश्यक आहे. म्हणून त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करणे आणि ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. महानतेचा खरा अर्थ पदात नसून त्यागात, कर्तृत्वात आणि मौन सेवेत दडलेला असतो.
यशवंतराव हे दिल्लीत महाराष्ट्राचे वैभव होते, तर वेणूताई महाराष्ट्रीय संस्पृतीचे प्रतीक. मंत्र्यांची पत्नी कशी असावी? तिचा पेहराव, वागणूक कशी असावी? याच्या त्या आदर्श होत्या. वेणूताईंचे पाहुण्यांना, नातेवाईकांना आदरातिथ्य आश्चर्यचकित करत असे. त्यांच्याकडे काम करणाऱयांची सुखदुःखे त्या आपली समजत. महाराष्ट्रातील सर्व सण त्या उत्साहाने साजरे करत. नरक चतुर्दशीला बंगल्यातील सर्वांच्या घरी अगदी सकाळी साडेसात-आठलाच फराळाचे ताट येत असे. वेणूताईंना मंगळसूत्राखेरीज इतर दागिन्यांची मुळीच हौस नव्हती. वेणूताई यांच्या जीवनातील सुसंस्पृतपणा पदोपदी जाणवतो. वेणूताई यांच्या आयुष्यात कराड हा महत्त्वाचा विसावा आहे. अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांनी यशवंतरावांना ‘विरंगुळा’ हे घर घ्यायला लावले. आपल्या परिसराशी, प्रदेशाशी नाळ जुळवून घेणाऱया त्या होत्या. त्याच ठिकाणी कराडवासीयांसाठी, पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञान विकासासाठी ‘वेणूताई चव्हाण स्मारक प्रतिष्ठान’ उभारण्यात आले आहे. ते आजही सांस्पृतिक, शैक्षणिक व बौद्धिक प्रेरणेचे केंद्र म्हणून कार्यरत आहे.
महानतेचा खरा अर्थ पदात नसून त्यागात, कर्तृत्वात आणि मनसेवेत दडलेला असतो. वेणूताई यशवंतराव चव्हाण या एक महान नेत्या होत्या. त्यांच्या जीवनातून स्त्राr शक्तीचा सन्मान, साधेपणाची महानता आणि सामाजिक बांधीलकीचे महत्त्व अधोरेखित होते. त्यांच्या विचारांनी व कार्याने अनेक पिढय़ांना दिशा दिली आहे. वेणूताईंची प्राणज्योत 1 जून 1983 रोजी मालवली. त्यांना विनम्र अभिवादन.




























































