चायनीज मांजा पक्ष्यांच्या जिवावर; मालाड, दहिसरमध्ये 500 पक्ष्यांचे पंख कापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चायनीज मांजावर बंदी असतानाही मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात चायनीज मांजा वापरला गेला. काचेचा लेप आणि धारदार मांजामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात पक्षी जखमी झाले असून हा मांजा शेकडो पक्ष्यांच्या जिवावर बेतला आहे. मालाड, दहिसर भागात 500 पक्षी या मांजामुळे जखमी झाले असून या मांजावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.

मकरसंक्रांतीच्या दरम्यान मुंबईभर विविध स्वयंसेवी संस्था व मंडळाकडून 20 पेक्षा जास्त फ्री बर्ड मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले होते या कॅम्पमधून संपूर्ण मुंबईत 500 पेक्षा अधिक जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाड या भागांमध्ये सर्वाधिक घटना घडल्या असून या परिसरात 300 हून अधिक पक्ष्यांचे रेस्क्यू करण्यात आले. बंदी घालण्यात आलेल्या चायनीज मांजाची अनेक ठिकाणी सर्रास विक्री होत असल्याने पक्षीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे इतकेच काय तर या मांजामुळे पक्ष्यांसोबत अनेक नागरिकदेखील जखमी होत आहेत. या मांजावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली तरी घातक मांजा बाजारात सर्रास मिळत असल्याने त्यावर ठोस  कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.

मकरसंक्रांतीपासून अनेक पक्षी जखमी झाले. त्यात कबूतर, कावळा, घार या पक्ष्यांचा समावेश आहे. या पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात पंख कापल्याचे समोर आले आहे. जखमी पक्ष्यांचे पंख शिवून त्यांच्यावर योग्य उपचार करून सोडण्यात आले. या घटना मकरसंक्रांतीनंतरही सुरूच आहेत. डॉ. संतोष खोत