
अजित पवार यांच्या निधनानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयुष गोयल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याने अजितदादांच्या पक्षात खबळबळ उडाली. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आधी प्रफुल्ल पटेल आणि नंतर सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पटेलांबाबत पुडी सोडणाऱ्या गोयल यांची गोची झाली आणि ‘एका पत्रकाराने चुकीची माहिती दिल्याने मी बोललो’, असे सांगत त्यांनी पलटी मारली.
राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या, रांगड्या मातीतील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा कोणीही पाटील असावा पण पटेल नसावा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स पोस्टमधून मांडले होते. त्यात गोयल यांनी थेट पटेल यांच्या निवडीचा दावा केल्याने राजकारण ढवळून निघाले. गोयल यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया अजित पवार गटातून उमटल्या.
गोयल काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होईल असे मला वाटत नाही. अजित पवार यांनी महायुतीमध्ये उत्कृष्ट काम केले आहे आणि आता त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करतील. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास आणि मतं दोन्ही गमावली आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात निमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही, असे पीयूष गोयल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
गोयल म्हणाले, मी माफी मागतो!
पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा ठाम दावा पीयुष गोयल यांनी केला होता. मात्र, अजित पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी त्याचा इन्कार केल्याने गोयल यांनी माघार घेतली. नाव न घेता त्यांनी पत्रकारावर खापर फोडले. पटेलांच्या निवडीबाबत चुकीची माहिती मला एका ज्येष्ठ पत्रकाराने दिली होती. त्याची पडताळणी न करता मी माध्यमांत काही विधाने केली, पण त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱया माहितीबद्दल मी माफी मागतो, असे त्यांनी केले.
सुनेत्रा पवार याच सर्वेसर्वा!
सुनेत्रा पवार या पक्षाच्या नेत्या आहेत. त्याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार, बाकी कुणीही नाही, असे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या पदावर सुनेत्रा पवारच असतील असेही ते म्हणाले. तर भाजपला आमचा अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार नाही, असे आमदार सुनील शेळके यांनी सुनावले. पक्षाची सर्व जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून, पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
असा कोणताही निर्णय झाला नाही
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्याचा निर्णय झालेला नाही. इतका महत्त्वाचा निर्णय पक्षातील प्रमुख नेते आणि आमदारांशी सल्लामसलत केल्याशिवाय, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय होणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
भाजपची कोणतीही सूचना नाही
पक्षात सर्वांच्या भावना जाणून अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरेंनी सांगितले. पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, राज्यसभेचा उमेदवार कोण असावा, हे ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. भाजपने कधीही आम्हाला याबाबतीत सूचना केल्या नाहीत, असे ते म्हणाले.


























































