
येत्या 15 फेब्रुवारीला हिंदुस्थानविरुद्ध होणाऱया लढतीवर पाकिस्तानी सरकारने बहिष्कार घातला असला तरी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानने त्यांच्या पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. दबावाच्या क्षणी पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाने हिंदुस्थानसमोर गुडघे टेकले आणि ‘जिंका किंवा मरा’च्या लढतीत हिंदुस्थानने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
पाकिस्तानसमोर 253 धावांचे आव्हान होते आणि ते 33.3 षटकांत पूर्ण करण्याची अट होती, मात्र निर्णायक टप्प्यावर पाकिस्तान 5 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारू शकला. उपांत्य फेरीचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांचा डाव अखेर 46.2 षटकांत 194 धावांवर आटोपला आणि हिंदुस्थानने 58 धावांनी सामना खिशात घातला. अष्टपैलू कामगिरी करणारा कनिष्क चौहान सामन्याचा मानकरी ठरला.
रविवारी बुलवायोमध्ये प्रथम फलंदाजी करत हिंदुस्थानने 252 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच दबावाखाली अडकला. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानविरुद्ध 172 धावा करणारा समीर मिन्हास यावेळी पूर्णपणे अपयशी ठरला. हेनिल पटेलने चौथ्याच षटकात पायचीत करून त्याला अवघ्या 9 धावांवर बाद केले आणि पाकिस्तानची घसरगुंडी सुरू झाली.
कनिष्क चौहानने हमजा झहूरचा 42 धावांवर त्रिफळा उडवत सामना हिंदुस्थानच्या बाजूने वळवला. उस्मान खानने 66 धावांची झुंज दिली, पण आयुष म्हात्रेने त्याला पायचीत करत पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशाही संपवल्या. याच गोलंदाजाने अहमद हुसेनलाही अवघ्या 2 धावांवर माघारी पाठवले. विहान मल्होत्राने अली हसन बलोचला 3 धावांवर झेलबाद केले, तर कर्णधार फरहान युसूफ 38 धावा करून आर. एस. अंब्रिशकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांचा एकामागोमाग एक पडदा पडत गेला आणि पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला.
हिंदुस्थानकडून खलिल पटेल आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आर. एस. अंब्रिश, हेनिल पटेल, कनिष्क चौहान आणि विहान मल्होत्रा यांनी प्रत्येकी एक विकेट टिपत पाकिस्तानचा कणा मोडला.
फलंदाजीत वेदांत त्रिवेदीने 68 धावांची जबरदस्त खेळी करत डावाला आकार दिला. वैभव सूर्यवंशीने 22 चेंडूंमध्ये 30 धावांची झटपट खेळी केली, तर कर्णधार आयुष म्हात्रेला खातेही उघडता आले नाही. मधल्या फळीत विहान मल्होत्रा 21, अभिज्ञान कंडू 16 आणि आर. एस. अंब्रिश 29 धावा करून उपयुक्त ठरले. अखेरच्या टप्प्यात कनिष्क चौहान 35 आणि खिलन पटेल 21 यांनी निर्णायक भागीदारी करत हिंदुस्थानला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने तीन, तर मोहम्मद सय्यामने दोन विकेट घेतले.



























































