कर्नाटकला ‘देव’ पावला! पडिक्कलच्या घणाघातामुळे कर्नाटकची उपांत्यपूर्व फेरीत झेप; मुंबईसह झारखंड, उत्तराखंड, आंध्र, जम्मू-काश्मिर, मध्य प्रदेशही बाद फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचा डाव 256 धावांवर संपला तेव्हा कर्नाटकचा संघ  साखळीतच बाद होणार असे भाव कर्नाटक संघाच्या खेळाडूंच्या चेहर्यावर उमटले होते.. सामना अनिर्णित राहिल्यास कर्नाटकचा संघ साखळीतच बाद होणार होता आणि सौराष्ट्रला बाद फेरीत स्थान मिळणार होते. त्यातच कर्नाटकसमोर अवघ्या 30 षटकांत 250 धावांचे अवघड आव्हान होते, पण पडिक्कल कर्नाटकसाठी देवासारखे धावून आला आणि त्याने रणजी सामन्याला टी-20चा मुलामा चढवत मोहालीत चौकार-षटकारांची आतषबाजी करत पंजाबचे उपांत्यपूर्व फेरीचे आव्हानच संपुष्टात आणले नाहीतर स्वता धडक मारली.देवदत्त पडिक्कलच्या 86 चेंडूंतील 5 षटकार आणि 6 चौकारांच्या फटकेबाजीने उभारलेल्या 120 धावांच्या अभेद्य खेळीने कर्नाटक संघाला रणजी करंडकाची बाद फेरी गाठून दिली. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांची गाठ मुंबईशी पडेल. तसेच झारखंड-उत्तराखंड, मध्य प्रदेश-जम्मू आणि काश्मीर, बंगाल आणि आंध्र अशा उपांत्यपूर्व लढती येत्या 6 फेब्रूवारीपासून खेळल्या जातील.

आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये या मोसमात जबरदस्त लयीत असलेल्या पडिक्कलने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी साकारण्याचा पराक्रम केला. मोहालीतील वर झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात चौथ्या दिवशी कर्नाटकसमोर 250 धावांचे कठीण आव्हान होते. पंजाबला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात असतानाच पडिक्कलने एकहाती सामन्याची दिशा बदलली.

अवघ्या 27.5 षटकांत लक्ष्य

कालपासून चिवट फलंदाजी करणारा पंजाबचा संघ 101 षटके खेळून 256 धावांवर बाद झाला. त्यामुळे कर्नाटकला विजयाशिवाय पर्याय नव्हता. कारण कालच सौराष्ट्रने नागालॅण़्चा डावाने पराभव करत दुसर्या स्थानी झेप घेतली होती. पण कर्नाटकने विशेष करून देवदत्तने अद्भूत खेळ केला आणि आपल्या संघाला अवघ्या 27.5 षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थानही मिळवून दिले. या विजयामुळे 27 गुणांसह कर्नाटक गुणतालिकेत मध्य प्रदेशच्या पाठोपाठ दुसर्या स्थानावर राहिला तर सौराष्ट्र 26 गुणांसह तिसर्या क्रमांकावर घसरला आणि स्पर्धेतून बाद झाला.

पडिक्कलची झंझावाती भागीदारी;  संकटात संघाला सावरले

चौथ्या दिवशी के. एल. राहुल स्वस्तात बाद झाला. तरीही पडिक्कलने 72 चेंडूत 113 धावांची आक्रमक भागीदारी रचत संघाला विजयाच्या मार्गावर आणले. मयंक अगरवाल 36 चेंडूत 53 धावा करून बाद झाल्यानंतर अनीश के. व्ही. आणि स्मरण रवीचंद्रन झटपट बाद झाले. क्षणातच 1 बाद 130 वरून कर्नाटकची अवस्था 4 बाद 134 अशी दयनीय अवस्था झाली.

श्रेयस गोपालची अफलातून साथ

या टप्प्यावर पडिक्कलला अपेक्षित साथ मिळाली ती श्रेयस गोपालकडून. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 चेंडूत 67 धावांची निर्णायक भागीदारी केली. गोपाल 22 चेंडूत 33 धावा करून बाद झाल्यानंतर विद्याधर पाटील मैदानात उतरला. पण पडिक्कलने शेवटपर्यंत किल्ला लढवत कर्नाटकला अफलातून विजयश्री मिळवून दिली. रणजीच्या मैदानात प्रथमच टी ट्वेण्टी क्रिकेटला साजेसा खेळ पाहायला मिळाला.

मुंबईदिल्ली सामना अनिर्णित

आयुष दोसेजाच्या 159 धावांच्या झुंजार खेळीने मुंबई-दिल्ली यांच्यातील सामना अनिर्णितावस्थेत संपवला. मुंबईने आधीच बाद फेरी गाठली होती. त्यामुळे आजच्या खेळाला विशेष महत्त्व नव्हते. मात्र आंध्र प्रदेशने नागालॅण्डविरुद्धचा सामना अनिर्णित राखत पहिल्या डावातील आघाडीचे 3 गुण मिळवत विदर्भला आव्हान दिले. विदर्भनेही उत्तर प्रदेशचा 4 विकेट राखून पराभव केला. परिणामता विदर्भ आणि आंध्रचे समसमान 31 गुण झाले आणि अखेर नेट रनरेटच्या आधारे आंध्रने गतविजेत्या विदर्भला मागे टाकत बाद फेरी गाठली. त्यामुळे अ गटातून झारखंड आणि आंध्र बाद फेरीत पोहोचले तर ब गटातून मध्य प्रदेश आणि कर्नाटकने बाजी मारली. क गटातून बंगाल, उत्तराखंड अव्वल ठरले तर ड गटातून अपराजित मुंबईसह जम्मू आणि काश्मिरने उपउपांत्य फेरी गाठली.