एक वादग्रस्त विधान अन् आंध्र प्रदेश पेटले; माजी मंत्री जोगी रमेश यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर लावली आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि मंत्री नारा लोकेश यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर संतप्त टीडीपी कार्यकर्त्यांनी वायएसआरसीपी नेते आणि माजी मंत्री जोगी रमेश यांच्या इब्राहिमपटनम येथील निवासस्थानावर हल्ला केला. संतप्त आंदोलकांनी जोगी रमेश यांच्या घराचा घेराव केला आणि घराच्या काही भागाला आग लावली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलक पोहोचण्यापूर्वीच जोगी रमेश घर सोडून निघून गेले होते, मात्र त्यांचे वडील, पत्नी आणि मुलगा घरातच होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

इब्राहिमपटनम येथील अंजनेयस्वामी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जोगी रमेश यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश यांच्यावर असंसदीय भाषेत टीका केली होती. तिरुपती लाडू वाद आणि एसआयटी चौकशीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. यामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. जोगी रमेश यांच्याविरोधात टीडीपीचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले.

महिलावरम, विजयवाडा आणि जी. कोंडूर येथून मोठ्या संख्येने टीडीपी कार्यकर्ते जमा झाले. दुसरीकडे, वायएसआरसीपी समर्थकही घटनास्थळी पोहोचल्याने दोन्ही गटांत जोरदार राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करावा लागला. इब्राहिमपटनम रिंग रोडवर टीडीपीने रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

दरम्यान, आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) दुर्गा राव यांनी दिली आहे.

एका विशिष्ट ‘पॅटर्न’नुसार हल्ले

माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मागासवर्गीय नेते असलेल्या जोगी रमेश यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विरोधकांना धमकावण्यासाठी एका विशिष्ट ‘पॅटर्न’नुसार हल्ले केले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.