
तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हे ‘विकसित भारताचे’ सर्वात मोठे इंजिन असल्याचे वर्णन निर्मला सीतारामन यांनी केले. भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही तर त्याचे नेतृत्व करेल असे त्या म्हणाल्या.हिंदुस्थानातील ऑनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेट क्रिएटर प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली. यासाठी मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजीवर जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.
पुढील 4 ते 5 वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये 20 लाखांपेक्षा जास्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे देशभरातील 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये विशेष कंटेट क्रिएटर प्रयोगशाळा उभारण्यात येतील. त्यातून विद्यार्थ्यांना गेम डिझाईन, ऑनिमेशन, व्हिज्युअल स्टोरी टेलिंग आणि डिजिटल कंटेट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येईल. गेमिंगकडे केवळ मनोरंजनाचा नव्हे, तर रोजगाराचे माध्यम म्हणून पाहायला हवे. मात्र या प्रयोगशाळांमध्ये शिकवणार कोण, कोणते टुल्स वापरण्यात येतील, याबाबत अर्थसंकल्पातून ठरावीक दिशा देण्यात आलेली नाही.
‘नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड’ची स्थापना करण्यात येणार आहे. महत्त्वाची स्थळे, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा डिजिटल स्वरुपात या ग्रिडच्या माध्यमातून जतन करण्यात येईल. यातून स्थानिक संशोधक, इतिहासतज्ञ तसेच कंटेट क्रिएटर्स यांना नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.























































