
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ येथे अमेरिका आणि इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी नेत्यांची एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली. इराणसोबतचा संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच या दोन मित्रराष्ट्रांनी लष्करी रणनीतीवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे.
या बैठकीत अमेरिकेचे ‘चेअरमन ऑफ द जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’ जनरल डॅन केन आणि इस्रायलच्या सशस्त्र दलाचे प्रमुख एयाल झमीर सहभागी झाले होते. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली असून, त्यातील तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने या भागात आपली नौदल आणि हवाई संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत केली आहे.
खामेनींचा ‘प्रादेशिक युद्धा’चा इशारा
दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. इराणमधील १९७९ च्या इस्लामिक क्रांतीच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘अमेरिकेने जर आमच्यावर हल्ला केला, तर ते केवळ इराणपुरते मर्यादित न राहता संपूर्ण पश्चिम आशियात ‘प्रादेशिक युद्धा’चे स्वरूप धारण करेल. आम्ही कोणत्याही देशावर आधी हल्ला करणार नाही, पण कोणाचे आक्रमण खपवूनही घेणार नाही’.
खामेनी यांनी इराणमधील ताज्या जनक्षोभाला ‘सत्तांतराचा कट’ (Coup) असल्याचे म्हटले असून, निदर्शकांवरील कारवाईचे समर्थन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
इराणच्या या इशाऱ्यावर बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘आमची सर्वात शक्तिशाली जहाजे तिथे तैनात आहेत. आम्हाला आशा आहे की काहीतरी तडजोड (Deal) होईल. तडजोड झाली नाही, तर खामेनी यांचे म्हणणे किती खरे आहे हे जगाला दिसेलच’. ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आणि मानवाधिकार उल्लंघनावर वारंवार आक्षेप घेतला आहे.
युद्धाचे ढग आणि जागतिक चिंता
इराणने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ या खनिज तेलाच्या महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर युद्धसराव करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी कडक इशारा दिला आहे. इराणमधील अंतर्गत असंतोष आणि अमेरिकेची लष्करी हालचाल यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या क्षेत्राकडे लागले आहे.
us-israel hold secret military talks at pentagon amid iran war warnings
senior us and israeli military leaders met at pentagon as iran’s khamenei warns of a regional war following trump’s military deployment in west asia.























































