
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी रात्री SIR मधील विसंगती आणि अन्याय नोंदीप्रकरणी पीडित कुटुंबांसह दिल्लीत पोहोचल्या. दिल्ली पोलीस बंगालमधील लोकांना त्रास देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सोमवारी सकाळी त्यांनी चाणक्यपुरी आणि हेली रोड येथील बंग भवनला भेट दिली. सध्या पीडित कुटुंबे तिथे राहत आहेत. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली पोलिस बंगालमधील लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. दिल्लीत स्फोट झाल्यावर पोलीस काय करतात? आता बंग भवनाबाहेर एवढ्या पोलीस तैनातीचे काय कारण आहे? असा सवालही त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेतील कथित पीडितांसह निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या तयारीत असताना दिल्लीतील बंगा भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनातीवर आक्षेप घेतला. आम्ही निषेध करण्यासाठी नव्हे तर न्याय मागण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी बंग भवनभोवती दिल्ली पोलिसांनी केलेल्या मो्या फौजफाट्याच्या तैनातीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, मी १०० प्रतीकात्मक लोकांना घेऊन आले आहे. ज्यांना एसआयआरमध्ये मृत दाखवण्यात आले आहे परंतु ते जिवंत आहेत. यामध्ये असे लोक आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा एसआयआरमुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांकडून या लोकांना त्रास दिला जात आहे. मात्र, आम्ही दिल्ली पोलिसांना दोष देत नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारेच यासाठी जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
आम्ही निषेध करण्यासाठी आलो नाही. आमच्या लोकांना त्रास देऊ नका. हे लोक राहतात तिथे जाऊन लोकांना त्रास देत आहात. SIR मध्ये १५० लोक मृत्युमुखी पडले. आमच्या अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे. आम्ही न्यायासाठी दिल्लीत आलो आहोत. आम्ही पीडितांचे रक्षण करण्यासाठी आलो आहोत. दिल्लीत असा छळ आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नाही. आम्हीही १५ वर्षे दिल्लीत घालवली आहेत. मृतांचे कुटुंबीय माध्यमांशी बोलू शकत नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.
एसआयआर प्रक्रियेतील कथित पीडितांसह ममता बॅनर्जी निवडणूक आयोगाला भेट देण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यासोबत १५ सदस्यांचे शिष्टमंडळ असेल. तृणमूल काँग्रेसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, बंग भवनाबाहेर सकाळपासून दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पक्षाचे नेते आणि पीडितांच्या हालचालींवर बंदी घालणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलिसांवर थेट हल्लाबोल केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, असे म्हटले आहे की बंग भवनच्या कोणत्याही परिसरात कोणाच्याही हालचालीवर कोणतेही निर्बंध नाहीत. पोलिसांच्या मते, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित घटना किंवा अनावश्यक व्यत्यय टाळण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती ही केवळ खबरदारीचा उपाय आहे.

























































