
केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर करण्यात आला. त्यात शेअर बाजारावरील व्यवहारांवरील STT करात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा होताच शेअर बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे एक हजार अंकांची घसरण झाली होती. सोमवारी बाजार सुरू होताच याचा दबाबव बाजारावर दिसून आला. त्यामुळे सोमवारी दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार झाले. मात्र, बाजार बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या तासात शानदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स ९४४ अंकांनी म्हणजेच १ टक्क्यांहून वाढून ८१,६६६.४६ वर बंद झाला. तर निफ्टी २६३ अंकांनी म्हणजेच १ टक्क्यांनी वाढून २५,०८८.४० वर बंद झाला. निफ्टी बँकेनेही २०० अंकांची वाढ नोंदवली. या तेजीत गुंतवणूकदारांनी ५ लाख कोटी रुपयांची कमाई केली.
गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजारात अचानक वाढ झाली. लार्ज-कॅप शेअर्समध्ये लक्षणीय खरेदी झाली, विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमुळे बीएसईचे बाजार भांडवल ५ लाख कोटींनी वाढण्यास मदत झाली. बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी फक्त ५ शेअर्स २ टक्क्यांनी घसरून बंद झाले. उर्वरित २५ शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. पॉवरग्रिड सारख्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अदानी पोर्टचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढला आणि मुकेश अंबानीचा शेअर ३ टक्क्यांनी वाढला.
गुंतवणूकदारांना शेअर बाजारात मोठी विक्री झाल्याने आता खरेदी करण्याची संधी आहे, असे जाणवले आणि त्यांनी मोठया प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे आरआयएल, पॉवरग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि सन फार्मा यांसारखे हेवीवेट शेअर्स ७% पर्यंत वाढले. रविवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराला मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १,५५० अंकांनी घसरला, तर निफ्टी २९५ अंकांनी घसरला. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मूल्य अंदाजे ११ लाख कोटींनी घसरले. तथापि, सोमवारी त्यांचे मूल्यांकन ५ लाख कोटींनी वाढले.

























































