
देशाची राजधानी दिल्लीत मानव तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीत 2015 ते 2025 या 11 वर्षाच्या काळात दररोज 63 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतून एकूण 2 लाख 55 हजार 432 लोक बेपत्ता झाले आहेत त्यापैकी 2 लाख 1 हजार 455 लोकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 53 हजार 977 लोक अजूनही बेपत्ता आहेत. मागील 11 वर्षात नवजात बाळांपासून 18 वर्षांपर्यंतचे 5 हजार 559 मुले बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
बेपत्ता झालेल्या साडेपाच हजारांपैकी 4 हजार 864 मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतून दररोज 63 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यामागे मानव तस्करी केली जात असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मानव तस्करी झालेल्या 6 हजार 759 मुलांची सुटका करण्यात यश आले असून यामध्ये 2 हजार 134 मुली तर 3 हजार 281 मुलांचा समावेश आहे. दिल्लीत 2 हजार 407 मानव तस्करीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या मुलांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथून आणलेल्या मुलांचा समावेश आहे. देशातील आकडा हा चिंताजनक आहे. कारण, 250 हून अधिक जास्त सामाजिक संघटनांनी 2023 ते 2026 या दरम्यान मानव तस्करी करण्यात आलेल्या 1 लाख 25 हजार 408 मुलांची सुटका केली आहे. यावेळी 56 हजार 459 मानव तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



























































