
अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित फाइल्स जगजाहीर होताच अनेक दिग्गजांचे कारनामे जगासमोर येत आहेत. त्यात आता नॉर्वेच्या एका मुत्सद्याने हिंदुस्थानी नागरिकांबाबत केलेली एक घृणास्पद टिप्पणी समोर आली आहे. या मुत्सद्याने हिंदुस्थानींना सापापेक्षा वाईट म्हटले आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित सुमारे 30 लाखांहून अधिक फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. या फाईल्समधून जगभरातील मोठे आणि प्रभावशाली लोकांची लपलेली सत्ये बाहेर येत आहेत. याच कागदपत्रांमध्ये नॉर्वेचे मुत्सद्दी टेर्जे रॉड-लार्सन यांनी 25 डिसेंबर 2015 रोजी एपस्टीन याला केलेला एक ई-मेल आहे. एपस्टीनने लार्सनला एका हिंदुस्थानी नेत्याचा ई-मेल फॉरवर्ड केला होता. याच्या उत्तरात लार्सनने म्हटले होते की, ’जेव्हा तुम्ही एका हिंदुस्थानी आणि एका सापाला भेटता, तेव्हा आधी हिंदुस्थानीला मारून टाका.’ मात्र, लार्सनने हा ई-मेल का लिहिला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ब्रिटनच्या शाही परिवारातील काळे सत्य
ब्रिटिश प्रिन्स अँड्रय़ूने 2008 मध्ये लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनला आपल्या मुलींचे फोटो पाठवले होते. हा खुलासा 2010 आणि 2011 च्या ईमेलमधून झाला आहे. या ईमेलमध्ये प्रिन्सेस बीट्रिस आणि प्रिन्सेस युजेनीचे फोटो समाविष्ट आहेत. त्यानंतर 20 डिसेंबर 2012 रोजी आणखी काही पाठवण्यात आले. प्रिन्सेस युजेनीने काही दिवसांपूर्वीच अँड्रय़ूसोबतचे सर्व संपर्क तोडले आहेत. याशिवाय आणखी एक धक्कादायक खुलासा या ईमेलमधून झालेला आहे. प्रिन्स अँड्रय़ूसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी एपस्टीनने एका पीडितेला बळजबरी प्रिन्स अँड्रय़ूच्या रॉयल लॉज निवासस्थानी पाठवले होते. पीडितेच्या वकिलाने याबाबत दावा केला आहे. ही महिला ब्रिटिश नागरिक नव्हती.
ब्रिटनचे माजी राजदूत दिसले अंतर्वस्त्रात
एपस्टीन फाइल्समध्ये माजी ब्रिटिश राजदूत पीटर मँडेलसन यांचा एक फोटो समोर आला आहे. त्यात मँडेलसन एका महिलेसोबत दिसत असून ते अंतर्वस्त्र, टी-शर्ट आणि बाथरोबमध्ये दिसत आहेत. या फोटोनंतर, मँडेलसन यांनी पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या लेबर पार्टीचा राजीनामा दिला आहे. पक्षाला आणखी लाजिरवाणे बनवू इच्छित नसल्याने राजीनामा देत असल्याचे मॅडेलसन यांनी म्हटले आहे.






























































