हॉकी वर्ल्डकपही खेळला; आता T-20 World Cup मध्ये धमाका करण्यासाठी 42 वर्षीय खेळाडू सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC T20 World Cup 2026 सात फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व संघ सध्या कसून सराव करत आहेत. 20 संघ विजेतपेदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. या 20 संघांमध्ये इटली हा एकमेव देश आहे, जो पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. इटलीचा समावेश ग्रुप सी मध्ये असून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे तगडे संघ या ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे इटलीला कडव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

इटलीच्या संघाची जशी चर्चा आहे, तशीच चर्चा इटलीचा 42 वर्षीय कर्णधार वेन मॅडसन याची सुद्धा आहे. कारण क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने यापूर्वी हॉकी वर्ल्डकपमध्ये सुद्धा देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, रंजक गोष्ट अशी की, तो हॉकी वर्ल्ड कपमध्ये इटलीकडून नाही तर, दक्षिण आफ्रिकेकडून मैदानात उतरला होता. 2006 साली तो दक्षिण आफ्रिकेकडून वयाच्या 22 व्या वर्षी हॉकी वर्ल्ड कप खेळला होता. त्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावलं. मात्र, त्याला इंग्लंडकडून आणि दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आपला मोर्चा इटलीकडे वळवला आणि 2023 साली इटलीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केलं.

ICC T20 World Cup – टी-20 वर्ल्डकपमध्ये ‘ओल्ड इज गोल्ड’; चाळीशी पार केलेले ‘हे’ खेळाडू तरुणांना देणार आव्हान!

टी-20 क्रिकेटमध्ये इटलीचं प्रतिनिधीत्व करताना त्याने आतापर्यंत 7 सामने खेळले असून 205 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर दोन अर्धशतकांचा सुद्धा समावेश आहे. मॅडसनच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता त्याने 219 टी20 सामने खेळले असून 5516 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.