
तीव्र घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मंगळवारी चांदी एकाच दिवसात ३४,००० रुपयांनी वाढली, तर सोने देखील ८००० रुपयांनी वाढून १.५३ लाख रुपयांवर पोहोचले. नुकताच चांदीने ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर फक्त चार दिवसांत २ लाख रुपयांनी घसरला. या घसरणीबद्दल, “रिच डॅड, पुअर डॅड” या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना या घसरणीबद्दल घाबरून जाण्याऐवजी आणखी खरेदी करण्याचा सल्ला दिला. ही घसरण तात्पुरती ठरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. आता त्यांचे हे भाकीत खरे ठरले आहे.
सोने आणि चांदीच्या घसरणीबद्दल कियोसाकी म्हणाले की, ते सोने आणि चांदीच्या किमती घसरणे म्हणजे क्रॅश नसून नफावसुली आणि विक्रीमुळे आलेले करेक्शन आहे. तसे ही घसरण अप्लकालीन असल्याने गुंतवणुकदारांना आणखी सोने-चांदी खरेदीसाठी ही चांगली संधी आहे, असे ते म्हणाले होते. अमेरिका हिंदुस्थान व्यापार करारासह अनेक घडामोडींमुळे मंगळवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे रॉबर्ट कियोसाकी यांचे भाकीत दोन दिवसातच खरे ठरले आहे.
२९ जानेवारी रोजी ४२०,०४८ रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर, ५ मार्च रोजी एक्सपायरी डेट असलेली चांदी सोमवारी व्यवहाराच्या सुरुवातीच्या वेळी २२५,८०५ रुपयांवर घसरली, जी या उच्चांकापेक्षा १९४,२४३ रुपयांनी कमी होती. मात्र, मंगळवारी त्यांच्या किमतीत वाढ झाली आणि गुंतवणूकदारांना दिलास मिळाला. चांदी आता २७०,२२९ रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोने सोमवारी १,९३,०९६ रुपयांच्या उच्चांकावरून ५४,२०८ रुपयांनी घसरला आणि मंगळवारी १,५३,४६० रुपयांवर पोहोचला.
सोने आणि चांदी झालेल्या घसरणीनंतर खरेदी करण्याची ही संधी सोडू नका, असा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला होता. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा वॉलमार्ट विक्री असते तेव्हा गरीब गर्दी करतात आणि त्यावेळी श्रीमंत फक्त खरेदी करतात, खरेदी करतात आणि खरेदी करतात. जेव्हा बाजारातील घसरण होते तेव्हा गरीब लोक त्यांची मालमत्ता विकून पळून जातात, तर श्रीमंत गर्दी करतात आणि खरेदी करायला लागतात.

























































