
डीडब्ल्यूजे कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संचालक संकेश घाग याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. मात्र या आरोपीला पोलिसांनी व्हिआयपी ट्रिटमेंटमध्ये चिपळूण शहरातील प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये जेवायले नेले. पोलीस आरोपीच्या बाजूला बसून जेवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून सर्वसामान्यांना लाठी आणि आरोपीला मटणाची वाटी असं चित्र पहायला मिळत आहे.
टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी संकेश घागला चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस अमंलदारही त्याच्या बाजूला बसून जेवण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. आता या पोलिसांवर गृहखाते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारच्या राज्यात सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, मात्र गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो अशी अवस्था झाली आहे. चिपळूण मध्ये कोट्यावधी रूपयांना चुना लावून पळालेल्या टीडब्ल्यूजेच्या संचालकाला पोलिसांनी पकडले मात्र त्याची शाही बडदास्त ठेवत त्याला हॉटेलमध्ये जेवायला नेले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.


























































