आठ दिवसांत पीएफ मिळणार! ईपीएफओ झाले अधिक डिजिटल आणि स्मार्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफओची यंत्रणा बऱयाच अंशी डिजिटल आणि अधिक स्मार्ट झाली आहे. ईपीएफओ 3.0 अंतर्गत झालेल्या बदलामुळे पीएफचे पैसे काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि जलद झाले आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत याबाबतची माहिती देताना सांगितले की, आता ऑनलाईन ईपीएफ क्लेमचा निपटारा अवघ्या आठ दिवसांत होत आहे. म्हणजे तुमची माहिती योग्य असेल आणि केवायसी पूर्ण झालेली असेल तर आठवडाभराच्या आत पीएफची रक्कम तुमच्या खात्यात येऊ शकते.

याआधी ईपीएफ क्लेम करताना काही कालावधी जायचा. कर्मचाऱयांच्या कंपन्यांकडून प्रक्रियेला विलंब व्हायचा किंवा प्रोफाईलमधील चुकांमुळे फाईल अडकून राहायची. मात्र आता ईपीएफओ 3.0 मध्ये सुधारणा झाल्यानंतर हे चित्र बदलले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 23 जानेवारी 2026 पर्यंत ईपीएफओने 8.53 कोटींपेक्षा अधिक प्रकरणांची क्लेम प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.  दरम्यान, नव्या सिस्टममुळे पीएफ काढणे सोपे झाले आहे.

फेस ऑथेंटिकेशन सिस्टम  

फेस ऑथेंटिकेशन सिस्टम सुरू करण्यात आले आहे. ऑगस्ट 2025 पासून नव्या कर्मचाऱयांना ‘यूएएन’ तयार करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. उमंग अॅपच्या माध्यमातून ‘आधार’ आधारित फेस वेरिफिकेशन करून कर्मचारी स्वतःच ‘यूएएन’ बनवून ऑक्टिवेट करू शकतात.

कोणत्याही बँकेतून पेन्शन घ्या

ईपीएफओ 3.0 अंतर्गत सेंट्रलाईज्ड पेन्शस सिस्टम लागू करण्यात आले आहे. याचा अर्थ पेन्शनधारकांना कोणत्याही एका विशिष्ट बँकेवर अवलंबून राहायची गरज नाही. देशभरातील कोणत्याही शेडय़ुल बँकेतून पेन्शन मिळू शकते. वृद्ध पेन्शनधारकांना ही सुविधा दिलासादायक ठरेल.

कंपनीची मंजुरी नसेल तरी चालेल… 

ईपीएफओ 3.0 चा सर्वात मोठा लाभ अशा कर्मचाऱयांना होतोय, ज्यांचे ई केवायसी अपडेट आहे. असे कर्मचारी आता पीएफ ट्रान्स्फरसाठी जुन्या किंवा नव्या कंपनीच्या मंजुरीशिवाय डायरेक्ट ऑनलाईन क्लेम फाईल करू शकतात. यामुळे जे कर्मचारी नोकऱया बदलतात, पण जुन्या कंपन्यांशी संपर्क साधू शकत नाहीत, अशा लोकांना याचा लाभ होईल. कर्मचारी स्वतःच पोर्टलच्या माध्यमातून पैसे काढायचे काम करू शकतात.