रेल्वेच्या डब्यात रंगले महानगर साहित्य संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेला समर्पित असे महानगर साहित्य संमेलन नुकतेच झाले. ‘मुंबई आणि मुंबईतील लोकल ट्रेन’ या संकल्पनेला अनुसरून विविधांगी कार्यक्रम संमेलनात सादर झाले. त्यातून अस्सल मुंबईचे दर्शन झाले. ट्रेनच्या डब्यातच जणू अवघे संमेलन रंगले. या निमित्ताने आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशनाने 48 वे महानगर साहित्य संमेलनाचे आयोजन केले. प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी या संमेलनाचे अध्यक्ष होते, तर विश्वास नांगरे पाटील उद्घाटक आणि स्वागताध्यक्ष प्रा. उषा तांबे होत्या. ‘साहित्याला तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे पर्याय काही शोधू शकतो का? यावर अशा संमेलनांमधून चिंतन व्हायला हवे,’ अशी अपेक्षा सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केली. उद्घाटनाच्या प्रसंगी डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, रजनीश राणे, अश्विनी भालेराव गांधी, आनंद बिरजे, प्रा. प्रतिभा सराफ उपस्थित होते.

बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रम  

शाहीर नीलेश जाधव यांच्या मुंबईच्या पोवाडय़ाने संमेलनास प्रारंभ झाला. एम. मल्टिमीडिया या संस्थेने संकेत तांडेल लिखित आणि प्रशांत माधव जोशी दिग्दर्शित लोकलही एकांकिका सादर केली. ‘आपली मुंबई खरेच बदलली आहे का?’ या विषयावरील परिसंवादात संजय सावंत आणि अरुण पुराणिक सहभागी झाले. गोविंद नारायण माडगावकर यांच्या मुंबईचे वर्णनआणि नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबईया पुस्तकातील उताऱयांचे अभिवाचन अभिनेता, दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी केले. मुंबईतील खाद्य संस्पृतीवर संजीव साबडे आणि वाचन संस्पृतीवर मुकेश माचकर यांचे गप्पाष्टक रंगले. संमेलनाचा समारोप सानिका कणसे हिच्या रेल्वे भजनाने झाला. भालचंद्र म्हात्रे यांनी संमेलनाच्या संकल्पनेस अनुरुप उभा केलेला लोकलचा हुबेहुब डबा आणि मुंबई शहराचे वैशिष्टय़ दाखवणारे नेपथ्य यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले.