
घरासमोरील गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवून थकलेले ज्येष्ठ नागरिक कस्तुरचंद राठोड (६७) यांनी आज थेट खोपोली नगर परिषदेत धडक देत अनोखे आंदोलन वेले. राठोड यांनी स्वतःचे कपडे उतरवून अधिकाऱ्यांसमोर फेकले आणि अधिकाऱ्यांची पोटं भरत नसतील तर माझे कपडे विका पण घरासमोरील गटाराचे काम करा असे उद्विग्न उद्गार काढले. राठोड यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची अक्षरशः तंतरली.
खोपोलीच्या शिळफाटा येथील रहिवासी असलेले कस्तुरचंद राठोड हे गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या घरासमोरील गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. या गटार बांधणीसाठी त्यांनी किमान १०० वेळा नगरपालिकेत फेऱ्या मारल्या, अर्ज दिले, विनंती केल्या. मात्र त्यांच्या या मागणीकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केले.
अखेर प्रशासनाच्या मुजोरीला कंटाळून राठोड यांनी खोपोली नगर परिषद गाठली. नगर अभियंता अनिल वाणी यांच्या दालनात जात राठोड यांनी स्वतःचे कपडे उतरवले आणि ते वाणी यांच्यासमोर भिरकावले. जनतेची कामे करण्यासाठी तुमच्याकडे पैसा नसेल आणि पैसे खाऊन तुमचे पोट भरत नसेल तर माझे कपडे विका पण माझे काम करा, असा संताप त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाच्या दणक्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच नाचक्की झाली. दरम्यान राठोड यांच्या या आंदोलनानंतर तरी नगरपालिका प्रशासन ठोस कार्यवाही करते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
वाणी यांचे बघतो… करतो
राठोड यांच्या आंदोलनामुळे नगर अभियंता अनिल वाणी हडबडून गेले. आधी त्यांनी हे माझे काम नाही असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा सगळा विभाग तुमच्या अधिपत्याखाली चालतो मग ही तुमची जबाबदारी नाही काय, असा सवाल राठोड यांनी विचारल्यानंतर वाणी यांनी बघतो.. करतो असे सांगत वेळ मारून नेली.
































































