
सुप्रिया प्रॉडक्शन आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा 2026’ची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, माटुंगा येथे जल्लोषात रंगली. स्पर्धेत ‘नाटय़ांकुर, मुंबई’च्या ‘पाकिस्तानचं यान’ या ‘घाटी’ बोलीतील एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा ‘नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार’ पुरस्कार पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार ‘नाटय़ारंभ, एन.के.टी.टी. ठाणे’च्या ‘सत्य’ या ‘मालवणी’ बोलीतील एकांकिकेने आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ‘नक्षत्र कलामंच, मुंबई’च्या ‘पाकळ्या’ या खान्देशी बोलीतील एकांकिकेने मिळविला. ‘घाटी’ बोलीतील ‘डिझाईन’ या एकांकिकेने ‘प्रेक्षक पसंती’ पुरस्कार पटकावला. या वर्षी स्पर्धेत राज्यभरातून 10 बोलींतील 18 एकांकिका सहभागी झाल्या. अंतिम फेरीसाठी 7 एकांकिकांची निवड करण्यात आली होती. स्पर्धेचे 9 वे वर्ष आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मिलिंद शिंदे, संदीप रेडकर व मंगेश सातपुते यांनी काम पाहिले, अशी माहिती सुप्रिया प्रोडक्शनच्या सुप्रिया चव्हाण यांनी दिली.





























































