
>> मिलिंद देखणे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी राज्याच्या कानाकोपऱयात दौरे केले. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते निवडणुकांच्या मैदानात झुंजत राहिले. त्यांच्या याच कष्टाचे फलित म्हणून अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे. मात्र, राज्यात मिळालेले हे एकमेव ‘महापौरपद’ पाहण्यासाठी आज ना अजितदादा हयात आहेत, ना जिह्याच्या राजकारणातील झुंजार नेतृत्व शिवाजीराव कर्डिले.
अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने 27 जागांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर मित्रपक्ष भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती पहिली अडीच वर्षे महापौरपद राष्ट्रवादीला, तर उपमहापौरपद भाजपला देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. महापौरपदासाठी ज्योती गाडे (राष्ट्रवादी) आणि उपमहापौरपदासाठी धनंजय जाधव (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अडीच वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळावी, यासाठी महायुतीने ‘सव्वा वर्षाचा’ फॉर्म्युला अमलात आणला आहे. पहिली सव्वा वर्ष गाडे आणि जाधव काम पाहतील, त्यानंतर दुसऱया दोघांना संधी दिली जाणार आहे. महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून, ज्योती गाडे या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या असल्या तरी त्यांच्याकडे या प्रवर्गाचा अधिकृत दाखला आहे.
राजकीय वारसा आणि पाठबळ
नवनियुक्त महापौर उमेदवार ज्योती गाडे या आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुणी आहेत, तर धनंजय जाधव हे तत्कालीन उपनगराध्यक्ष कृष्ण जाधव यांचे चिरंजीव असून, विखे यांचे खंदे समर्थक आहेत. विखे, जगताप आणि कर्डिले अशा तीन मोठय़ा राजकीय शक्ती एकत्र आल्याने महापालिकेवर महायुतीची पकड मजबूत झाली आहे.
अजितदादांचा तो शेवटचा संघर्ष…
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांसाठी प्रत्येक निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. महायुतीमधील घटक पक्षांशी जुळवून घेतानाच विरोधकांना अंगावर घेण्याचे दुहेरी आव्हान त्यांच्यासमोर होते. ज्यावेळी त्यांचा विमान अपघात झाला, त्यावेळीही ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच निघाले होते. अहिल्यानगरमधील हे यश त्यांच्या त्याच संघर्षाची पावती आहे. मात्र, हे यश पाहण्यासाठी ‘दादा’ नाहीत, ही बाब कार्यकर्त्यांसाठी चटका लावणारी आहे.
कर्डिलेंच्या संघर्षाचा ‘सुवर्णक्षण’
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शून्यातून आपले राजकीय साम्राज्य उभे केले. आपल्या हयातीत त्यांनी तीन लेकींना राजकारणात आणले. एक लेक यापूर्वीच उपमहापौर झाली होती, तर दोघींनी नगरसेवक म्हणून काम पाहिले. आज त्यांची लेक थेट शहराच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होत आहे. कर्डिले आणि जगताप कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असला, तरी कर्डिलेंची उणीव या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवत आहे.





























































