पंतप्रधान मोदींची संसदेत येण्याची हिंम्मत नाही, नरवणे यांच्या पुस्तकावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुस्तकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “लोकसभा अध्यक्ष म्हणतात की हे पुस्तक अस्तित्वात नाही. सरकार म्हणते ते अस्तित्वात नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही हे पुस्तक नाही असे सांगतात. पण देशातील प्रत्येक तरुणाला माहीत आहे की हे पुस्तक अस्तित्वात आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदींची संसदेत येण्याची हिंम्मत नाही, ते संसदेत आले तर त्यांना मी हे पुस्तक देईन असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी माजी सैन्यप्रमुक मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत सांगितले की, या पुस्तकातील मुख्य मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत आहे. “या पुस्तकातील सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे पंतप्रधानांनी दिलेला संदेश – ‘जो योग्य वाटेल ते करा’,” असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तत्कालीन लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून ‘चिनी रणगाडे आपल्या हद्दीत आले आहेत, आता काय करायचे?’ असा प्रश्न विचारला, तेव्हा सुरुवातीला त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. “नरवणे यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि संरक्षण मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कुणाकडूनही उत्तर मिळाले नाही,” असा दावा राहुल गांधी यांनी केला.

यानंतर नरवणे यांनी पुन्हा राजनाथ सिंह यांना फोन केला असता त्यांनी ‘मी वरून विचारतो’ असे सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले. “वरून आदेश होता की चिनी सैन्य आले तरी परवानगीशिवाय गोळीबार करायचा नाही. मात्र नरवणे आणि आपले सैन्य चिनी रणगाड्यांवर गोळीबार करू इच्छित होते, कारण त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला होता,” असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशावर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, “‘जे योग्य वाटेल ते करा’ असा संदेश देऊन पंतप्रधानांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यांनी लष्करप्रमुखांना ‘तुम्हाला जे करायचे ते करा, ते माझ्या हातात नाही’ असेच सांगितले,” असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, आत्मचरित्रात लष्करप्रमुखांनी आपण एकटे पडलो असून संपूर्ण यंत्रणेकडून आपल्याला वाऱ्यावर सोडले गेले, अशी भावना व्यक्त केली आहे. “हीच गोष्ट मी संसदेत बोलू नये, अशी सरकारची भीती आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांवर थेट आव्हान देताना राहुल गांधी म्हणाले, “आज पंतप्रधान लोकसभेत येण्याचे धैर्य दाखवतील, असे मला वाटत नाही. जर ते आले, तर मी हे पुस्तक त्यांना देणार आहे.”