
देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या टेरेसवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण आयआयटी परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नमन अग्रवाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी होता. नमन आयआयटी बॉम्बेमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक 4 च्या टेरेसवरून त्याने अचानक उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले इतर विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेतली आणि पोलिसांना तसेच आयआयटी प्रशासनाला या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नमनला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नमनने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आयआयटी प्रशासनाकडून अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत असून आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.































































