Under 19 World Cup – युवा खेळाडूंची ‘दादा’गिरी; अफगाणिस्तानच्या चिंध्या उडवल्या अन् फायनलमध्ये मारली धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने अफगाणिस्तानचा 7 विकेटने धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाला जिंकण्यासाठी 311 धावांचे मोठे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी तोडफोड फटकेबाजी करत गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. अॅरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी आणि आयूष म्हात्रे या तिघांनीच अफगाणिस्तानला चोपून काढलं आणि सामनाही जिंकला.

हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सेमी फायनलचा सामना पार पडला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या फैसज शिनोजादा (110) आणि उझैरल्लाह नियाझाई (101*) यांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने चार गड्यांच्या मोबदल्यात 310 धावा केल्या आणि 311 धावांचे आव्हान टीम इंडियाला दिले. आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सलामीची जोडी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. अॅरोज जॉर्जने 104 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 2 षटकार मारत 115 धावांची सलामी दिली. तर वैभव सूर्यवंशीने 33 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 68 धावांची वादळी खेळी केली. तर कर्णधार आयुष म्हात्रेनेही आपले हात धुवून घेत 62 धावांची झंझावती खेळी केली. त्यानेही 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले. विहान मल्होत्राने नाबाद 38 धावांची विजयी खेळी केली आणि टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 310 धावांचा डोंगर भेदून काढला.