सामना अग्रलेख – पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला हा व्यापार करार नाहीच, तर सरळ सरळ देशाच्या अन्नदात्याविरुद्ध केलेली युद्धाची घोषणा आहे. देशातील शेतकरी व कष्टकऱ्यांनी आता एकजूट होऊन त्याबद्दल जाब विचारावा लागेल की, प्रधानमंत्री मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘मोदी घाबरले आहेत. हा व्यापार करार चार महिन्यांपासून थांबला होता. कोणत्या तरी रहस्यमय कारणाने घाईघाईने मोदी यांनी काल संध्याकाळी या करारावर सही केली.’’ श्री. राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या शरणागतीची कारणे सांगून टाकली. मोदी सरकारने अमेरिकेच्या पायाशी भारतीय शेतकऱ्यांचे हित व राष्ट्राचे सार्वभौमत्व गहाण टाकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आता एक क्षणही पदावर राहू नये!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी व्यापार करार झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशात उत्सव सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जग जिंकल्याच्या थाटात जाहीर केले की, ‘‘भारताच्या 140 कोटी जनतेसाठी ही शानदार घोषणा आहे. दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि मोठे लोकशाही देश एकत्र येतात तेव्हा लोकांचा फायदाच फायदा होतो.’’ मोदी यांनी स्वतःच जाहीर केले की, ‘‘भारत ही मोठी अर्थव्यवस्था आहे.’’ मात्र 1 तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘पोकळ-फुसका’ अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजार कोसळून धराशायी झाला होता आणि भारतीय अर्थव्यवस्थेची हवाच निघाली होती. ज्या प्रे. ट्रम्प यांच्याशी व्यापार करार झाला त्या अमेरिकेच्या डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया 92 पर्यंत घसरला आहे. त्यावर मोदी यांचे अंधभक्त म्हणतात, ‘‘इथे डॉलर्सची उठाठेव कशाला करता? भारतात काय डॉलरने व्यवहार होतो?’’ हे विधान म्हणजे ‘जसा राजा तशी प्रजा’ या पठडीतले आहे. भारतीय रुपयाचे इतके अवमूल्यन कधीच झाले नव्हते, पण मोदी व त्यांचे लोक प्रे. ट्रम्प यांच्याशी व्यापार होत आहे या आनंदात मशगुल आहेत. प्रे. ट्रम्प हे मोदींचा नवा देव आहे. प्रत्यक्षात ट्रम्प यांनी भारताचा घात केला आहे. ट्रम्प यांच्याशी झालेला व्यापार करार म्हणजे देश अमेरिकेच्या पायाशी गहाण टाकल्याचा पुरावा आहे. राहुल गांधी यांनी बेडरपणे सांगितले की, ‘‘पंतप्रधान मोदी प्रचंड घाबरले आहेत. त्यांच्यावर प्रे. ट्रम्प यांचा प्रचंड दबाव आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर सही करून मोदींनी देशाला विकले आहे.’’ भारताने आता अमेरिकेच्या सर्व अटी-शर्ती मान्य केल्या व त्या बदल्यात अमेरिकेने भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ 18 टक्क्यांवर येईल. मुळात भारतावर आधी 3.31 टक्के टॅरिफ होते, ते आता 18 टक्के झाले आहे. अर्थात या

व्यापार करारात

काय आहे? भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, तर फक्त अमेरिकेकडून तेल खरेदी करेल. अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनांवर व अन्य मालांवर भारत टॅरिफ लावणार नाही. जवळ जवळ ‘शून्य’ टॅक्स असेल. त्यामुळे भारत देशातील शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे. भारतीय शेतकऱ्यांवर हा सगळय़ात मोठा आघात आहे. प्रे. ट्रम्प यांनी मोदींचा हवाला देत सांगितले आहे की, भारत अमेरिकेकडून 500 बिलियन डॉलर्सची तेल खरेदी करेल. कृषी उत्पादने, कोळसा, तंत्रज्ञानाची खरेदी विनाटॅक्स करेल. अमेरिकेबरोबरचा हा करार म्हणजे अमेरिकेला देशाचे सार्वभौमत्व विकल्यासारखेच आहे. अमेरिकेचा कापूस, दूध, दुधाचे पदार्थ, म्हणजे दही, चीज, डाळी, सोयाबीन, मका, बदाम, अक्रोड, पिस्ता, भाज्या, फळे, फुले वगैरे खुलेआम भारतीय बाजारात विक्रीस येतील. या विक्रीवर कोणताही ‘टॅक्स’ नसल्याने भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी भावात अमेरिकेचा माल विकला जाईल. मग भारतीय शेतकरी व शेतमजुरांनी काय करायचे? कसे जगायचे? भारतातील अमेरिका कृषी व्यापार आधी 50 बिलियन अमेरिकी डॉलर होता. तो आता 500 बिलियन डॉलर इतका होईल. भारतीय शेतकऱ्यांचे रक्त व घामाचे शोषण करून अमेरिकेतील शेतकऱ्यांना हा लाभ होईल आणि त्याला भारताच्या पंतप्रधानांनी मान्यता दिली. लाखो भारतीय शेतकरी, शेतमजूर या करारात ठार मरणार आहेत व मोदी या कराराचा विजय उत्सव साजरा करीत आहेत. शेतकरी, छोटे उद्योजक, कुटीर उद्योजकांना रस्त्यावर आणणारा व्यापार करार पंतप्रधान मोदी यांनी केला. अमेरिकेतील शेतकरी

भारतीय शेतकऱ्यांचे रक्त शोषून

आता मालामाल होईल. अमेरिकेतील शेतकऱ्यांचे हित प्रे. ट्रम्प यांनी पाहिले व अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी त्यांनी भारताला गुलाम बनवले. ज्या देशातला शेतकरी रोज कर्जात बुडून आत्महत्या करतोय, त्या देशातले सरकार परदेशी कृषी उत्पादनांसाठी ‘रेड कार्पेट’ टाकत आहे. झिरो टॅरिफचा सरळ अर्थ इतकाच की, अमेरिकेतील सबसिडीवाले स्वस्त व कुजके धान्य भारतात भरभरून येईल व भल्या पहाटे कृषी बाजारात ढकलले जाईल, ही भारतीय शेतकऱ्यांशी केलेली बेइमानी आहे. मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला हा व्यापार करार नाहीच, तर सरळ सरळ देशाच्या अन्नदात्याविरुद्ध केलेली युद्धाची घोषणा आहे. देशातील शेतकरी व कष्टकऱ्यांनी आता एकजूट होऊन त्याबद्दल जाब विचारावा लागेल की, प्रधानमंत्री मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट? भारताच्या पंतप्रधानांनी प्रे. ट्रम्प यांच्या पुढे पत्करलेली ही शरणागती आहे. राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘मोदी घाबरले आहेत. हा व्यापार करार चार महिन्यांपासून थांबला होता. कोणत्या तरी रहस्यमय कारणाने घाईघाईने मोदी यांनी काल संध्याकाळी या करारावर सही केली. मोदींवर भयंकर दबाव आहे. मोदींचा मुखवटा आता गळून पडेल. आमच्या पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेत गौतम अदानीवर एक खटला सुरू आहे. ‘एपस्टीन फाईल्स’मधला बराच स्फोटक माल अद्याप बाहेर यायचा आहे.’’ श्री. राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या शरणागतीची कारणे सांगून टाकली. भाजप कसला उत्सव साजरा करीत आहे? मोदी सरकारने अमेरिकेच्या पायाशी भारतीय शेतकऱ्यांचे हित व राष्ट्राचे सार्वभौमत्व गहाण टाकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आता एक क्षणही पदावर राहू नये!