
मुंबईतील विश्वास या एनजीओतर्फे जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सर जनजागृती आणि रुग्णसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, केअरगिव्हर्स (caregivers), समाजसेवक आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. या एनजीओ तर्फे आयोजित ‘सिम्फनी ऑफ होप’ (Symphony of Hope) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरेश अग्रवाल यांनी स्थापन केलेली ‘विश्वास’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या गरीब रुग्णांना ही संस्था केवळ निवाराच देत नाही, तर त्यांच्या मोफत उपचारांची सोयही करते. या संस्थेने आयोजित कार्यक्रमात कॅन्सर जनजागृती आणि रुग्णसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, केअरगिव्हर्स (caregivers), समाजसेवक आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला आमदार अतुल भातखळकर व प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यात पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल सेंटर मधील नामवंत डॉक्टरांचा ऑन्कोलॉजी आणि रुग्णसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सचिन अलमेल; मानवता आणि सामाजिक नेतृत्वाचा वारसा जपणारे ‘एम्पल मिशन’चे संस्थापक डॉ. अनिल के. मुरारका; वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुराद लाला; रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रंजित बाजपेयी आणि डॉ. विवेक आनंद; सॉलिड ट्यूमर युनिटचे प्रमुख डॉ. कुमार प्रभाष; माजी शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बनावली; रेडिओडायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी; एचपीबी आणि जीआय सर्जरीचे उपाध्यक्ष डॉ. गणेश नागरजन; प्रख्यात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रमाकांत देशपांडे; ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जरीचे उपाध्यक्ष डॉ. मनीष अग्रवाल; ब्रेस्ट सर्जरी विभाग प्रमुख डॉ. अमर देशपांडे; युरोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत बडवे; स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेणुबाला राऊत आणि ऑन्कोलॉजी विभाग प्रमुख डॉ. आशा कपाडिया यांचा समावेश होता. तसेच, प्राणीमित्र डॉ. नीलिमा परांजपे; वकील आणि परोपकारी श्री. अरुण केजरीवाल; आणि समाजसेवक श्री. कृष्ण महाडिक यांचाही सन्मान करण्यात आला. कला विश्वातून अभिनेत्री उर्वशी उपाध्याय आणि अभिनेता करण मेहरा यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी आणि सामाजिक कार्यातील सहभागासाठी गौरविण्यात आले.
यावेळी ‘विश्वास’ टीमने हिंदुजा हॉस्पिटलला २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या माध्यमातून आगामी वर्षात ५० हून अधिक कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार देण्याचे NGO ‘विश्वास’चे उद्दिष्ट आहे.





























































