
प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळले. त्यांच्यासह सत्तेतील संविधानविरोधी प्रवृत्तींच्या निषेधार्थ नाशिक रोड येथून बुधवारी विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. ‘गिरीश महाजन हटाव, नाशिक बचाव’च्या घोषणांनी परिसर दणाणला होता.
‘आम्ही भारताचे लेक, नाशिककर’ या समितीच्या वतीने नाशिक रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. द्वारका मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रजासत्ताक दिनी जाणीवपूर्वक टाळणारे मंत्री गिरीश महाजन आणि धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणारे मंत्री नितेश राणे यांना तत्काळ मंत्रिमंडळातून वगळावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी माकपाचे ज्येष्ठ नेते डी.एल. कराड, राजू देसले यांच्यासह मोठय़ा संख्येने नाशिककर सहभागी झाले होते.


























































