
केवळ मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याचा गैरफायदा घेत आमदार अभिमन्यू पवारांनी सुरू केलेली हुकूमशाही पाहून निलंगेकर अवाक झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी तांबाळा गटात आपल्या पसंतीचा उमेदवार नसल्यामुळे चक्क भाजपलाच मतदान न करण्याचा फतवा काढला आहे. अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमदार पवारांनी भाजप कार्यकर्त्यांना अक्षरशः वेठबिगार केले आहे.
लातूर जिल्हा परिषदेतील तांबाळा गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या ठिकाणी भाजपने महानंदा दत्तात्रेय तुमपुटे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने अंजली चौधरी यांना मैदानात उतरवले होते. परंतु आमदार अभिमन्यू पवारांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण नाटय़ घडवून चौधरी यांच्यावर प्रचंड दबाव आणला आणि उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. अंजली चौधरी यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर तांबाळा गट बिनविरोध झाल्याचा डंका भाजपने वाजवला. परंतु अपक्ष उमेदवार मीरा व्यंकट तुबाकले यांचा अर्ज कायम राहिल्याने भाजपची कोंडी झाली.
आमदारांच्या हाती कमळ सोडून ऊस!
भाजपचा अधिकृत उमेदवार रिंगणात असतानाही आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार बलकुंदा येथे जाहीर सभा घेऊन अपक्ष उमेदवार मीरा तुबाकले यांचा प्रचार करण्याचे फर्मान सोडले. ‘मी सांगतो त्यालाच मतदान करा,’ अशी तंबीही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली. केवळ पसंतीचा उमेदवार नसल्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला थेट पाडण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र आमदार पवार यांच्या या हुकूमशाहीविरुद्ध पक्षातच नाराजी उफाळून आली आहे. आमदारांनी वाट्टेल ते करावे, त्यासाठी आम्हाला का वेठीला धरता? असा प्रश्न आता कार्यकर्तेच विचारत आहेत.
कार्यकर्ते संभ्रमात
‘वर ऊस आणि खाली कमळ’ या विचित्र समीकरणामुळे सर्वसामान्य मतदार आणि निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. स्वत: भाजपचे आमदार असूनही अधिपृत उमेदवाराऐवजी अपक्षाचा प्रचार करणे, हा पवारांचा दुटप्पीपणा असल्याची जाहीर टीका होत आहे. राजकारणात निष्ठा ही वाहत्या पाण्यासारखी नसते, ती एका चिन्हाशी बांधील असावी लागते. मात्र, सोयीच्या राजकारणासाठी ‘ऊस’ आणि ‘कमळ’ यांची जी गल्लत केली जात आहे, ती मतदारांची थट्टा आहे, असेही बोलले जात आहे.




























































