
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तालुक्यातील ओझेवाडा जंगल परिसरात गेल्या 24 तासांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या गोळीबारात नक्षलवाद्यांचा धैर्याने सामना करताना जवान दीपक मडावी यांना वीरमरण आले आहे. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना मोठे यश आले आहे. शोध मोहिमेदरम्यान या तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या चकमकीत जोगा मडावी हे दुसरे जवान गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ओझेवाडा परिसरात अद्यापही नक्षलवाद्यांच्या हालचाली लक्षात घेता पोलिसांनी सर्च ऑपरेशन अधिक तीव्र केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात नक्षलविरोधी मोहीम राबवली जात आहे.


























































