
सध्या राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. चंद्रपूरात काँग्रेसमधील अंतर्गत वाद शांत होत नाही तोच, आता भाजपमध्येही महापौर पदावरून गटबाजी उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत नाव जाहीर करूनही, ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
चंद्रपूरमध्ये महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महापौर पदासाठी संगीता खांडेकर यांचे नाव निश्चित केले होते. पक्षादेशानुसार खांडेकर यांनी आपला नामांकन अर्जही दाखल केला. मात्र, काही वेळातच भाजपच्याच सारिका संदूरकर यांनी आपला अर्ज भरल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसमधील वादाची चर्चा सुरू असतानाच आता भाजपमध्येही दोन गट सक्रिय झाल्याचे यावरून दिसून येते. पक्षाने एका नावाची घोषणा केलेली असतानाही, ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराने नामांकन अर्ज भरणे, हे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजीचे लक्षण मानले जात आहे.



























































