
सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने शहर हादरले आहे. मुलतानी बेकरीचे मालक व प्रसिद्ध उद्योगपती सुनील सदारंगानी (वय ५९) यांनी सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
सदारंगानी हे शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पनाश अपार्टमेंटच्या सतराव्या मजल्यावर गेले. तिथे आधी त्यांनी हात जोडून प्रार्थना केली. त्यानंतर ते खाली बसले व थेट 17 व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली आणि अपार्टमेंटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सदारंगानी हे होटगी रोड परिसरातील ‘मुलतानी बेकरी’ या प्रसिद्ध बेकरीचे मालक होते. एकेकाळी ‘मुलतानी ब्रेड’ हा ब्रँड सोलापुरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. मात्र काही वर्षांपूर्वी बेकरी व्यवसाय बंद पडल्याने त्यांना आर्थिक व वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.



























































