वेब न्यूज – स्मार्ट ग्लासेसचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

उद्याचे भविष्य म्हणून पहिले जाणारे स्मार्ट ग्लासेसचे तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडल्यास किती धोकादायक ठरू शकते याचा अनुभव परदेशातील काही तरुणींनी सांगितला आहे. स्मार्ट ग्लासेस अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला चष्मा होय. या चष्म्याचा वापर नकाशे बघणे, संगीत ऐकणे आणि एखादा व्हिडीओ रेकॉर्ड करणे अशा विविध कारणांसाठी करता येतो. मात्र याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही तरुणींचे त्यांच्या नकळत व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. या व्हिडीओंना लाखो लोकांनी पाहिले असून त्यावर गलिच्छ प्रतिक्रियादेखील देण्यात आल्या आहेत.

यापैकी एका तरुणीने आपल्या अनुभवात लिहिले आहे की, ती समुद्रकिनारी हिंडत असताना एक तरुण तिच्याशी बोलायला आला आणि त्याने तिला तिचे नाव विचारलं, तसेच फोन नंबरदेखील मागितला. मात्र तिने त्याला नम्रपणे नकार दिला. मात्र या घटनेचा व्हिडीओ ताबडतोब दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर झळकला. त्या तरुणाने बोलत असताना स्मार्ट ग्लासेसच्या मदतीने तिचा व्हिडीओ बनवला होता. भेदरलेल्या तरुणीने ताबडतोब पोलिसांची मदत घेतली. मात्र सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्यास कायद्याने परवानगी दिलेली असल्याने पोलीस तिची काही मदत करू शकले नाहीत. अगदी असाच अनुभव दुसऱ्या तरुणीला ती जिममध्ये व्यायाम करत असताना अनुभवायला मिळाला. तिचा व्हिडीओ तर चक्क तिलाच पाठवण्यात आला आणि टिकटॉकवर शेअरदेखील करण्यात आला होता. मात्र तिने धाडसाने लढा दिला आणि टिकटॉकच्या मदतीने तिचा व्हिडीओ पूर्णपणे डिलिट केला व तो टाकणाऱ्याचे खातेदेखील सस्पेंड करण्यात आले. या घटना समोर आल्यानंतर आता गुगल आणि मेटासारख्या कंपन्या स्मार्ट ग्लासेस बनवताना अधिक सुरक्षेचे उपाय योजण्याची ग्वाही देत आहेत.