
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील 36 तासांच्या वाहतूक काsंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक, वर्सोवा-वांद्रे वरळी सी लिंक तसेच कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून वांद्रे रेक्लमेशन सी लिंक परिसरात हेलीपॅड उभारण्याची चाचपणी सरकार दरबारी सुरु होण्याची चिन्हे आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिह्याचे पालक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची तातडीची गरज असल्याची मागणी मंत्री अॅड. शेलार यांनी केली आहे. या हेलिपॅडसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
हेलिपॅड उभारल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलवता येईल. तसेच प्रमुख रुग्णालयांपर्यंत जलद सेवा देता येणार आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल असेही पत्रात म्हटले आहे.































































