
क्रिकेटच्या सर्वात वेगवान फॉरमॅटचे वर्ल्ड वॉर आजपासून हिंदुस्थान आणि श्रीलंकेत पुढील 30 दिवस पेटणार आहे. 20 संघ, 55 सामने आणि सर्वांचे एकच ध्येय असले तरी जगज्जेता हिंदुस्थानी संघ आपले जगज्जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेट विश्वातील सारे धुरंधर एकाच ध्येयासाठी आपली सारी ताकद पणाला लावतील. प्रत्येक सामना षटकार-चौकारांची फटकेबाजी, विक्रमांची आतषबाजी करणारा असेल. म्हणजेच पुढचे 30 दिवस क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा झणझणीत आणि रोमांचक खेळ पाहायला मिळणार, हे पक्के आहे. या थराराची सुरुवात पहिल्याच दिवशी तीन सामन्यांनी होणार असून हिंदुस्थान क्रिकेटच्या जगतात बालवाडीत असलेल्या अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. म्हणजे विक्रमांची बरसात होणार, हे कुणीही सांगू शकतो.
हिंदुस्थानला 2023ला आपल्या घरच्या मैदानावर जगज्जेतेपदाची चव चाखता आली नव्हती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटचे पहिलेवहिले जगज्जेतेपद पटकावण्याची किमया साधली. त्या जगज्जेतेपदाने सूर्यकुमार यादवचा संघही उत्तेजित झाला आहे. टी-20च्या मैदानात सुसाट आणि भन्नाट फॉर्मात असलेल्या हिंदुस्थानने नुकताच न्यूझीलंडचा 4-1 ने धुव्वा उडवलाय. तो दमदार खेळ पाहून हिंदुस्थानी संघ टी-20चा वर्ल्ड कप उचलण्यासाठी पुन्हा सज्ज असल्याचे दिसतेय. त्यानंतर वर्ल्ड कपपूर्वीच्या एकमेव सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप आपलाच आहे, हेसुद्धा ते दाखवण्यासाठी उत्सुक आहेत.
हिंदुस्थान जगज्जेतेपदासाठी सज्ज असला तरी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या संघांनाही कमी लेखून चालणार नाही. टी-20 क्रिकेटचा खेळ हा लॉटरीसारखा असतो. ती लॉटरी कुणालाही लागू शकते. 99 टक्के मेहनत लागते, पण एक टक्के नशीब घेऊन खेळणारा संघही जगज्जेता ठरू शकतो.
दोन वर्षांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 17 वर्षांची प्रतीक्षा संपवत हिंदुस्थानने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. 2007नंतर पुन्हा एकदा जगज्जेते पदावर नाव कोरलं आणि ‘आपणही शेवटच्या षटकात जिंकू शकतो’ हे दाखवून दिले. आता 2026मध्ये तोच आत्मविश्वास, तीच जिद्द आणि तीच विजयाची भूक संघात कायम आहे. हे सारे संकेत नव्या इतिहासाच्या दिशेने नेणारं आहे. सलग दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमीसंघ बनण्याची संधी हिंदुस्थानसमोर आहे.




























































