12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान, सोमवारी निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असून 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. सुरू होईल.

 मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला; तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण 25 हजार 471 मतदान केंद्रे आहेत. मतदानासाठी सुमारे 1 लाख 28 हजार कर्मचारी तैनात आहेत.

 निवडणुकीसाठी 25 हजार 471 मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 51 हजार 537 पंट्रोल युनिट आणि 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिटचा समावेश आहे.

या निवडणुकांमध्ये मोठय़ा संख्येने मतदान करून आपण आपल्या गाव व परिसराच्या उन्नतीत मोलाचे योगदान देऊ शकतो. सर्व मतदारांनी आवर्जुन मतदान करावे.
 दिनेश वाघमारे, निवडणूक आयुक्त

7438 उमेदवार रिंगणात

सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागांसाठी 2 हजार 624 उमेदवार मैदानात आहेत. सर्व 125 पंचायत समित्या मिळून एकूण 1 हजार 462 जागा असून, या जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.