
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर बुधवारी 32 तास झालेली महाकठीण कोडी फुटते तोच आज या महामार्गावर पुन्हा टॅफिक कोंडीचा फेरा आला. अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाक्यादरम्यान 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे पाच तास वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. मुंबईहून पुण्याकडे जाणऱ्या मार्गिकेवरील वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांसह प्रवासी व वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. एक्प्रेस वेवरील टॅफिककोंडीचा हा फेरा संपणार तरी केव्हा, असा एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरील 32 तास वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटापुटीला आला होता. मोठय़ा प्रयत्नाने वाहतूक पूर्ववत होऊन काही तास उलटले खरे. पण आज सकाळी पुन्हा हाच त्रास उद्भवला. खालापूर टोलनाक्यापासून अमृतांजन पुलापर्यंत वाहनांच्या तुफान रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणची वाहने कासवगतीने सुरू होती.
बोरघाटात ट्रक बंद पडला
एकीकडे आज पुन्हा मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरील वाहतुकीचा बोजवारा उडाला असतानाच जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिर परिसरात पाइप घेऊन जाणारा ट्रक बंद पडला. त्यामुळे बोरघाटातदेखील प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणारी पालखीदेखील याच ठिकाणाहून मार्गक्रमण करत होती. पालखीतील भक्तांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
- शनिवारी राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असल्याने अनेक खासगी पंपन्या व आस्थापनांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यातच शनिवार व रविवार सलग सुट्टय़ा आल्याने अनेक जण पुणे-महाबळेश्वरकडे पर्यटनासाठी निघाले. पण वाहतूककोंडीत ते फसले.
- गॅस टँकरच्या दुर्घटनेतील रखडलेली वाहने एकाच वेळी बाहेर पडल्याने त्याचादेखील ताण पडला. या अनेक कारणांमुळे आज सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत
एक्प्रेस वे ठप्प झाला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

































































