राज्यातील सात खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱया राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन, शिवसेना एक, कॉँग्रेस एक तर सत्ताधारी भाजपच्या कोटय़ातील तीन जागांचा समावेश आहे. विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीदरम्यानच सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होण्याचा अंदाज आहे.

राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे 4 तर भाजपचे 3 खासदार बिनविरोध निवडून गेले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, कॉँग्रेसकडून राजीव सातव, तर भाजपकडून भागवत कराड, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा समावेश होता. दरम्यान कोरोनामुळे सातव यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी कॉँग्रेसकडून रजनी पाटील यांना संधी देण्यात आली. उदयनराजे लोकसभेत निवडून गेले. त्यामुळे त्यांच्या जागी शेकापमधून भाजपात आलेल्या धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. यामुळे या निवडणुकीकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचे लक्ष लागून राहिले असून पुढील काही दिवसांत उमेदवारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

यांची मुदत संपणार

भाजप ः डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, रामदास आठवले (रिपाइं), राष्ट्रवादी काँग्रेस ः शरद पवार, फौजिया खान, शिवसेना ः प्रियांका चतुर्वेदी, कॉँग्रेस ः रजनी पाटील

असे असेल मतांचे गणित

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी एका उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे. यानुसार भाजपच्या 4, शिंदे गट 1, अजित पवार गट 1 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून येईल.

शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीला 6, मविआला 1 जागा

राज्यसभेच्या सात जागांसाठी 2020 मध्ये निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर मविआने चार जागा जिंकल्या होत्या. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून  उपलब्ध संख्याबळ पाहता, महायुतीच्या वाटय़ाला 6 जागा येतील. आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे.

विधानसभेत असे आहे संख्याबळ

महायुती ः भाजपचे 131, शिंदे गट 57, अजित पवार गट 40.

मविआ ः शिवसेना 20, कॉँग्रेस 16, राष्ट्रवादी कॉँग्रेस 10.

इतर ः अपक्ष 7, सपा 2, एमआयएम 1.

रिक्त जागा 2.