व्यापार करारावर परराष्ट्रमंत्री की वाणिज्यमंत्री उत्तर देणार? यापूर्वी शासनव्यवस्थेची एवढी मोठी सर्कस पाहिली नाही; आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान- अमेरिका व्यापार करार नुकताच झाला. त्याचे हिंदुस्थानसह जगभरात परिणाम दिसून आले. तसेच शेअर बाजार आणि सोन्याचांदीच्या दरावरही त्याचे परिणाम दिसून आले. विशेष म्हणजे हा करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या करारत नेमके काय आहे? देशाच्या कराराचा कसा आणि काय फायदा होणार आहे? याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांना चांगलेच फटकारले आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक्सवर पोस्टही केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आता हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणांबाबत विचारले असता, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणतात की वाणिज्य मंत्री यावर भाष्य करतील. तर वाणिज्य मंत्री म्हणतात की परराष्ट्र व्यवहार मंत्री यावर भाष्य करतील. या मंत्र्यांमध्ये किंवा विभागांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे की दोन्हीही करारबाबत अनभिज्ञ आहेत?, असा परखड सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, किमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तरी माध्यमांच्या प्रश्नांना खुलेपणाने उत्तरे देतात.यापूर्वी कधीही शासनव्यवस्थेची एवढी मोठी सर्कस पाहिली नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.