
कर्मचारी भविष्य निधी संगठन (ईपीएफओ)ने आपल्या खातेदारांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ईपीएफओकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही सदस्याने पीएफ काढताना योग्य कारण देऊनच पीएफ काढावा. अॅडव्हान्स्ड पीएफ काढण्यासाठी खोटे कारण देऊ नये. जर समजा कोणत्याही खातेधारकाने खोटे कारण देऊन नियमाच्या विरोधात जाऊन पीएफ काढला तर त्या खातेधारकाकडून दिलेले पैसे व्याजासह वसूल केले जातील. तसेच खातेधारकाकडून अतिरिक्त दंडसुद्धा वसूल केला जाईल.
ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी माहिती शेअर केली आहे. पीएफची रक्कम ही आवश्यक कारणांसाठी जसे, गंभीर आजारपण, लग्न, उच्च शिक्षण, घर खरेदी करणे, घराचे सुशोभिकरण करणे या कामांसाठी काढली जाऊ शकते. जर कोणत्याही सदस्यांनी खोटे आजारपण आणि खोटे लग्न सांगून पीएफची रक्कम काढली आणि तपासात ही बाब खोटी आढळली तर त्या सदस्याला चौकशीला सामोरे जावे
लागू शकते.
ईपीएफओ 3.0 लागू
2026 या वर्षात लागू करण्यात आलेल्या ईपीएफओ 3.0 नंतर पीएफ खात्यांवर देखरेख पूर्णपणे डिजिटल आणि एआय आधारित झाली आहे. ऑनलाइन क्लेमदरम्यान आधार, पॅन आणि बँक खात्याचा रियल टाइम व्हेरिफिकेशन केले जात आहे. वारंवार अॅडव्हान्स्ड पीएफ काढणाऱया सदस्याविरोधात सिस्टम स्वतः याची तपासणी करते.
- चुकीच्या पद्धतीने पीएफ काढला तर त्या रकमेवर दंडात्मक व्याज आकारले जाऊ शकते. हा व्याज दर पीएफच्या व्याजदरांपेक्षा जास्त असू शकतो. सर्वात मोठी कारवाई म्हणजे पीएफची पुढची रक्कम काढण्यावर निर्बंध घातले जाऊ शकतात.
विनाकारण पैसे काढणे टाळा
ईपीएफओने आपल्या सदस्यांना आवाहन केले आहे की, पीएफकडे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी सुरक्षित बचत म्हणून पाहा. पीएफच्या पैशांचा वापर केवळ गरजेच्या गोष्टीसाठीच करा. पैसे काढणे सोपे झाले असले तरी विनाकारण पीएफचे पैसे काढणे टाळा. पैसे काढण्यासाठी हॉस्पिटलचे बिल, लग्नपत्रिका अन्य खर्चासाठी प्रमाणपत्र मागितले जाऊ शकते.
























































