
राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदानात अनेक ठिकाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने गोंधळ निर्माण झाला. कधी व्होटिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, नावे गायब, केंद्र सापडेना अशा अनेक तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. शिवाय अनेक मतदान केंद्रांवर नियोजनाअभावी गर्दी वाढल्याने वादावादीचे प्रकारही घडले. त्यामुळे आजच्या मतदानात गोंधळ निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली.
मतदान केंद्रावर सकाळी 7.30 वाजल्यापासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्यभरात 60 हून अधिक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने निवडणूक प्रशासनाच्या सज्जतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मतदारांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले.
रायगड, अलिबाग आणि कर्जतमध्ये मतदान खोळंबले
रायगडमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अलिबाग येथील कावीर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया थांबली होती. कर्जतमधील हलवली केंद्रावरही मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला.
उमेदवाराच्या पतीने नारळ फोडून केली पूजा
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे उमेदवारांच्या पतीने मतदान केंद्रावर नारळ फोडत पूजा केली. पंचायत समितीच्या उमेदवार उर्मिला गोविंद डोने यांचे पती गोविंद यांनी चक्क मतदान केंद्रावर नारळ फोडून गुलाल उधळला.
लहान मुलाने केले मतदान
अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर जिल्हा परिषद उमेदवार अर्जून सिंह मोहिते-पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने ईव्हीएमचे बटन दाबले. याबाबत अर्जुन सिंग यांना विचारले असता ते म्हणाले, मुलाला मतदान कसे करतात हे पाहायचे होते म्हणून त्याला सोबत आणल्याचे सांगितले.
पाथरीत दोन पक्षाचे कार्यकर्ते भिडले
पाथरी तालुक्यात मतदान सुरू असताना काँग्रेस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. देवनांद्रा जिल्हा परिषद गटातील गुलशन नगर येथील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून प्रथम बाचाबाची झाली, त्यानंतर हाणामारी झाली. या झटापटीदरम्यान चाकू लागल्याने वसीम शेख जखमी झाला आहे.
ट्रकमध्ये भरून मतदारांना आणले
सिल्लोड तालुक्यातील अंभई गटासाठी ट्रकमध्ये भरून मतदारांना आणण्यात आले. या परिसरातील अनेक कामगार ऊसतोडीसाठी विविध जिल्ह्यांत गेले असल्याने त्यांना मतदानासाठी आणण्यासाठी थेट ट्रकचा वापर करण्यात आला. विविध जिल्ह्यांतून ट्रकद्वारे हे मतदार अंभई गटात दाखल होऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
चुकीचे बटन दाबल्यामुळे मशीन बंद
सोलापूर जिल्ह्यात अकलूजमधील एका केंद्रावर चुकीचे बटन दाबल्यामुळे मशीन बंद झाल्याची घटना घडली. जवळपास एक तासानंतर मशीनची दुरुस्ती झाली.
नागोठणे विभागातील पळस येथील नववधू अक्षता दुर्गावले हिचे वर्हाड प्रथम मतदान केंद्रात आले. तिने प्रथम मतदानाचा हक्क बजावला आणि नंतर तिचा विवाह सोहळा पार पडला.
आमदार भुमरेंच्या लहान मुलाच्या बोटाला लावली शाई
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोडमध्ये शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी आठ वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगून आपल्या बोटावर शाई लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदाराशिवाय इतर कुणालाही ईव्हीएम मशीनपर्यंत जाण्यास परवानगी नसते. या प्रकरणी आमदार भुमरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तासगावमध्ये मतदानावर बहिष्कार
तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अद्याप एकही मतदान झालेले नाही. गावात प्रस्तावित सोलर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
परभणीत बोथी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथी गाव आणि तांडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या करपरा नदीवरील पुलाच्या कामाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घालत संताप व्यक्त केला. एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर फिरकला नाही. सेलूचे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना दाद दिली नाही.
भाजप-शिंदे गटात वाद
सिल्लोड तालुक्यातील अंभई गटात मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजप-शिंदे गटात वाद झाला. नानेगाव येथे भाजपचे उमेदवार त्र्यंबक गव्हाणे बुथवर गेले असता तेथील नागरिकांनी त्यांना विरोध करत धक्काबुक्की केली. या गटातून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अमेर सत्तार निवडणूक लढवत आहे.
पुढे, किती टक्के मतदान?
राज्य निवडणूक आयोगाने सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. यानुसार रायगड ः 57.77, रत्नागिरी ः 47.38, सिंधुदुर्ग ः 50.10, पुणे ः 51.00, सातारा ः 51.02, सांगली ः 51.47, सोलापूर ः 47.66, कोल्हापूर ः 58.81, छत्रपती संभाजीनगर ः 51.52, परभणी ः 55.71, धाराशिव ः 50.07, लातुर ः 50.05 टक्के मतदान झाले.



























































